रिओ २०१६ ऑलिम्पिक स्पर्धेचा उदघाटन सोहळा ब्राझीलच्या मराकाना स्टेडियमवर नुकताच संपन्न झाला. ब्राझीलच्या संस्कृतीचे आणि पर्यावरण संरक्षणाचे संदेश देणाऱया सादरीकरणासोबतच स्पर्धेत सहभागी झालेल्या २०५ देशांच्या खेळाडूंच्या पथकांचे यावेळी पथसंचलन झाले. भारतीय खेळाडूंच्या पथकाचे संचलन यंदा नेमबाज अभिनव बिंद्रा याने केले.

वाचा: रिओ ऑलिम्पिकचा अभुतपूर्व उदघाटन सोहळा

२००८ मध्ये बीजिंग येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये अभिनवने दहा मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकून देशात नेमबाजीचे युग निर्माण केले. आज भारतातील अनेक नेमबाज अभिनवला आदर्श ठेवून सराव करताना किंवा नेमबाजीच्या क्षेत्रात येताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर ऑलिम्पिकमध्ये भारतीय पथकाचे नेतृत्त्व करण्याचा मान यंदा अभिनवला देण्यात आला. भारतीय खेळाडूंच्या पथकातील पुरूष खेळाडूंनी संचलनासाठी आपल्या पोशाखात ब्लेझरला पसंती दिली, तर महिला खेळाडूंनी साडी परिधान केली होती.

PHOTOS: रिओ ऑलिम्पिक उदघाटन सोहळ्याचा थाट..

संचलनासाठी भारताचे नाव घोषित होताच अभिनवने हाती असलेला राष्ट्रध्वज अभिमानाने फडकावून मोठ्या आत्मविश्वासाने संचलन केले. अभिनवपाठोपाठ भारताच्या सर्व खेळाडूंनी हाती उत्साहात पथसंचलन करत उपस्थितांना अभिवादन केले. ऑलिम्पिक स्पर्धेत यंदा भारताकडून आजवरचे सर्वात मोठे खेळाडूंचे पथक दाखल केले आहे. एकूण ११९ भारतीय खेळाडूंमध्ये पदकासाठीची झुंज पाहायला मिळणार आहे.