साधारण पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. जिनी आपल्या कुटुंबीयांसोबत शिकारीसाठी जंगलात गेली होती. त्या वेळी ती जेमतेम १४ वर्षांची होती. तिच्या वडिलांनी आसपासच्या झाडाझुडपांमध्ये हरिण असल्याची तिला बतावणी केली. त्यांना वाटलं जिनी त्याला कुतूहलानं पाहील. पण कसलं काय? जिनीनं बंदूक काढली आणि नेम धरून ट्रिगर दाबला.. क्षणार्धात त्या गोळीनं हरणाचा वेध घेतला होता. सारेच जण तिच्या धर्याकडे स्तब्धपणे पाहत होते. कारण ती गोळी मारेल, असा विचार कुणीही केला नव्हता. याच रोमांचक अनुभवामुळे सर्वाचाच तिच्यावरील विश्वास दृढ झाला. नेमबाजी या खेळाची वाट निवडण्यासाठी हेच साहस प्रेरणादायी ठरलं.

तसं तिचं खरं नाव व्हर्जिनिया थ्रॅशर. पण जिनी या टोपणनावानं ओळखली जाणारी व्हर्जिनिया खरोखरच ‘जिनी’यस आहे. प्रतिभेचं वरदान तिला जन्मजातच लाभलं आहे. त्यामुळेच अमेरिकेच्या कन्येने १९व्या वर्षी ऑलिम्पिक पदक जिंकण्याची किमया साधली. १० मीटर एअर रायफल प्रकारात तिनं पटकावलेल्या सुवर्णपदकानं रिओ ऑलिम्पिकमधील पहिल्या पदकाचा मान मिळवला.

नेमबाजीविषयी थ्रॅशर कुटुंबाला विलक्षण आकर्षण होतं. जिनीचे आजोबा, वडील आणि दोन्ही भाऊही उत्तम नेमबाजी करतात. त्यांच्यामुळेच तिला नेमबाजीमध्ये आत्मविश्वासाने पावलं टाकता आली.

जिनीचा जन्म न्यूयॉर्क शहरातील रोममध्ये झाला. वडील रॉजर थ्रॅशर हवाई दलात नोकरीला होते. त्यामुळे नवव्या इयत्तेत जाईपर्यंत थ्रॅशर कुटुंबीयांनी देशात नऊ वेळा घरे बदलली. त्यानंतर व्हर्जिनिया शहरात त्यांना स्थर्य मिळालं. वेस्ट स्प्रिंगफिल्ड हायस्कूलमध्ये तिनं शालेय शिक्षण घेतलं. याचप्रमाणे वेस्ट व्हर्जिनिया विद्यापीठातून जैववैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षण ती घेत आहे. याच ठिकाणी तेथील क्रीडा मानसतज्ज्ञ रेमंड प्रायर यांनी जिनीला खेळाकडे योग्य पद्धतीनं लक्ष केंद्रित करण्याचे धडे दिले. खेळामध्ये उत्साहानं कामगिरी करीत सातत्य कसं टिकवायचं, हे तंत्र प्रायर यांच्यामुळेच जिनीला अवगत झालं

जिनीचं आयुष्य शिकारीच्या त्या घटनेनं पालटलं नसतं, तर तिनं आइस स्केटिंग खेळात आपला ठसा उमटवला असता. शालेय दिवसांत या खेळात तिनं प्रावीण्य मिळवलं होतं. याशिवाय वाचन आणि प्रवासाचा छंद तिनं जोपासला होता.

जिनीचं घर एवढय़ातच पदकं आणि चषकांनी भरून गेलं आहे. आता यात ऑलिम्पिक सुवर्णपदकाची भर पडणार आहे. गेल्या वर्षी राष्ट्रीय नेमबाजी स्पध्रेत तिनं पाच पदकांची कमाई केली. यात एका सुवर्णपदकाचाही समावेश होता. राष्ट्रीय महाविद्यालयीन स्पध्रेतही तिनं दोन पदकांवर नाव कोरलं. रिओमध्ये याच वर्षी झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पध्रेत तिला दहावा क्रमांक मिळाला होता, तर म्यूनिक विश्वचषक स्पध्रेत ती चौथी आली होती. या तिच्या सर्व कामगिरीमुळेच ऑलिम्पिक स्पध्रेत तिला स्थान मिळालं होतं.

नेमबाजी या खेळात मानसिकतेचा कसा कस लागतो, हे आता जिनीला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे फक्त पदक मिळवणं नव्हे, तर खेळात सर्वोत्तम होणं, हेच ध्येय तिनं जपलं आहे. माझी प्रक्रिया आणि मी याकडेच गांभीर्यानं लक्ष देते. निकालाची अजिबात चिंता करीत नाही, हेच ती आपल्या यशाचं सूत्र सांगते. त्यामुळेच अमेरिका तिच्याकडे आशेनं पाहात आहे.

पहिल्यावहिल्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत सुवर्णपदक जिंकणाऱ्या जिनीनं डू लि आणि यि सिलिंग यांसारख्या दिग्गजांना मागे टाकलं. चीनच्या या दोन्ही नेमबाजांच्या खात्यावर ऑलिम्पिक सुवर्णपदकं जमा आहेत. त्यामुळेच जिनीचा पराक्रम हा प्रशंसनीय आहे.

 

 

Story img Loader