वृत्तसंस्था, सिडनी
फलंदाजीसाठी आव्हानात्मक ठरत असलेल्या खेळपट्टीवर डावखुऱ्या ऋषभ पंतने (३३ चेंडूंत ६१ धावा) थक्क करणाऱ्या फटक्यांच्या मदतीने आक्रमक अर्धशतक साकारले. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी, विशेषत: स्कॉट बोलँडने (४/४२) भारताच्या अन्य फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. त्यामुळे बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील निर्णायक पाचवा सामना रंगतदार स्थितीत पोहोचला आहे.
सिडनी क्रिकेट ग्राऊंडची (एससीजी) हिरवीगार आणि थोड्याफार भेगा असलेली खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी पोषक ठरत आहे. याचा भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोनही संघांतील गुणवान गोलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला आहे. त्यामुळे भारताच्या पहिल्या डावातील १८५ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा डाव १८१ धावांतच आटोपला. त्यानंतर भारताचा दुसरा डावही गडगडला. दुसऱ्या दिवसअखेर भारताची ६ बाद १४१ अशी स्थिती होती. त्यांच्याकडे १४५ धावांची आघाडी होती. रवींद्र जडेजा (नाबाद ८) आणि वॉशिंग्टन सुंदर (नाबाद ६) हे अष्टपैलू खेळपट्टीवर असून त्यांचा भारताला द्विशतकी मजल मारून देण्याचा प्रयत्न असेल.
पहिल्या डावात आपल्या खेळाची बचावात्मक बाजू दाखविणाऱ्या पंतने दुसऱ्या डावात मात्र आपल्या नैसर्गिक आक्रमक शैलीत खेळ केला. तो फलंदाजीला आला त्यावेळी भारताची ३ बाद ५९ अशी स्थिती होती. यशस्वी जैस्वाल (२२), केएल राहुल (१३) आणि विराट कोहली (६) या आघाडीच्या फलंदाजांना बोलँडने माघारी धाडले होते. मात्र, पंतने आपला निडरपणा दाखवून देताना अगदी पहिल्याच चेंडूवर क्रीजबाहेर येत बोलँडला षटकार खेचला. पुढच्याच षटकात पॅट कमिन्सला चौकार मारत त्याने आपले मनसुबे स्पष्ट केले. या दरम्यान शुभमन गिल (१३) फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाला. याचा पंतच्या खेळावर कोणताही परिणाम झाला नाही.
पंतने ब्यू वेबस्टरच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करताना सलग तीन चौकार मारले. पुलचा फटका मारताना त्याचा तोल घसरला. मात्र, त्याच्या बॅटचा चेंडूशी संपर्क झाला आणि चेंडूने सीमारेषा गाठली. मग वेबस्टरच्या पुढच्याच षटकात एकेक षटकार आणि चौकार, तर मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर षटकार खेचत त्याने अवघ्या २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पुढचा चेंडूही त्याने सीमारेषेबाहेर पोहोचवला. अखेरीस कमिन्सच्या गोलंदाजीवर कटचा फटका मारताना त्याच्याकडून चूक झाली. तो ३३ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६१ धावा करून बाद झाला. मग बोलँडने नितीश कुमार रेड्डीलाही (४) माघारी धाडले. त्यामुळे आता भारताची भिस्त जडेजा आणि वॉशिंग्टन जोडीवर असणार आहे.
हेही वाचा >>>Atul Subhash : अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, पत्नीसह सासरच्या लोकांना जामीन मंजूर
त्याआधी, दुसऱ्या दिवशी १ बाद ९ धावांवरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाने मार्नस लबूशेनला (२) सुरुवातीलाच गमावले. कर्णधार जसप्रीत बुमराने त्याचा अडसर दूर केला. युवा सलामीवीर सॅम कोन्सटासने (२३) सुरुवातीला वेळ घेतल्यानंतर धावांची गती वाढविण्याचा प्रयत्न केला. परंतु मोहम्मद सिराजने अप्रतिम आऊटस्विंग चेंडू टाकत त्याला बाद केले. याच षटकात सिराजने ट्रॅव्हिस हेडलाही (४) माघारी धाडले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची ४ बाद ३९ अशी स्थिती झाली.
यानंतर गेल्या दोन सामन्यांतील शतकवीर स्टीव्ह स्मिथ (५७ चेंडूंत ३३) आणि पदार्पणवीर वेबस्टर (१०५ चेंडूंत ५७) यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ५७ धावांची भागीदारी रचल्यानंतर स्मिथचा अडसर प्रसिध कृष्णाने दूर केला.
या मालिकेतील आपला पहिला सामना खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज प्रसिधने टिच्चून मारा केला. उंचपुऱ्या प्रसिधने योग्य टप्प्यावर गोलंदाजी करताना अॅलेक्स कॅरीची (२१) झुंजही मोडीत काढली. नितीश रेड्डीने कमिन्स (१०) आणि स्टार्क (१) यांना आपल्या सलग दोन षटकांत बाद केले. वेबस्टरने अर्धशतकी खेळी करताना प्रभावित केले. अखेरीस प्रसिधने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मग सिराजने बोलँडला (९) बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव १८१ धावांत संपुष्टात आणला.
संक्षिप्त धावफलक
● भारत (पहिला डाव) : १८५
● ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ५१ षटकांत सर्वबाद १८१ (ब्यू वेबस्टर ५७, स्टीव्ह स्मिथ ३३, सॅम कोनस्टास २३; प्रसिध कृष्णा ३/४२, मोहम्मद सिराज ३/५१, नितीश रेड्डी २/३२, जसप्रीत बुमरा २/३३)
● भारत (दुसरा डाव) : ३२ षटकांत ६ बाद १४१ (ऋषभ पंत ६१, यशस्वी जैस्वाल २२; स्कॉट बोलँड ४/४२, ब्यू वेबस्टर १/२४, पॅट कमिन्स १/३१)