Rishabh Pant Shikhar Dhawan Video: भारताचा तडाखेबाज डावखुरा फलंदाज आणि यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ऋषभ पंतची मर्सिडीज कार जळून अक्षरश: कोळसा झाली. ऋषभ पंत अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर डेहराडूनमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या कपाळाला, पाठीला, गुडघ्याला दुखापत झाली आहे. या अपघातानंतर क्रिकेट जगतासह सर्वच स्तरातील मंडळींनी तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना केली आहे. अपघातावेळी ऋषभ पंत कार चालवत होता आणि कार वेगात होती, असं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर आता ऋषभ पंतचा तीन वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये शिखर धवन ऋषभ पंतला गाडी हळू चालवण्याचा सल्ला देताना दिसत आहे.
कसा झाला अपघात?
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उत्तराखंडच्या रूरकी-नारसन सीमेवर हम्मदपूर परिसरात हा अपघात झाला. महामार्गावरच्या एका वळणावर ऋषभची कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या रेलिंगला धडकली आणि अपघात झाला. यावेळी हरियाणा परिवहन महामंडळाच्या बसवर चालक आणि वाहकाचं काम करणारे सुशील मान आणि परमजीत सिंग यांनी ऋषभला कारमधून वेळीच बाहेर काढलं. त्यानंतर कारनं पेट घेतला. यासाठी पानीपत बस डेपोकडून या दोघांचा सत्कारही करण्यात आला आहे.
हेही वाचा – Rishabh Pant Car Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऋषभ पंतच्या आईला फोन
तीन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल!
ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर काही तासांतच त्याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये शिखर धवन आणि ऋषभ पंत एकमेकांची चर्चा करताना दिसत आहेत. ऋषभने शिखरला विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल शिखरनं त्याला हा सल्ला दिला आहे. हा व्हिडीओ २०१९मधला असल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा – “ऋषभ पंतला आईला सरप्राईज द्यायचं होतं, पण…”, उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली माहिती
“मला काय सल्ला द्याल?”
“तुम्हाला मला जर एखादा सल्ला द्यायचा असेल, तर काय द्याल?” असा प्रश्न ऋषभनं शिखर धवनला विचारताच त्यानं “गाडी हळू चालवत जा”, असं सांगितलं होतं. त्यावर ऋषभनंही “ठीक आहे, मी तुमचा सल्ला मानतो. मी गाडी हळू चालवत जाईन”, असं म्हटल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
दरम्यान, ऋषभ पंतला चांगले वैद्यकीय उपचार मिळत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.
तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ऋषभ पंतला फोन करून त्याच्या प्रकृतीची चौकशी केल्याचं बीसीसीआयनं ट्विटरवर सांगितलं आहे.