पीटीआय, नवी दिल्ली
भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत दुखापतीवरील शस्त्रक्रियेसाठी तयार असून त्यामुळे तो अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून दूर राहणार आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी दिली.पंतला डेहराडून येथील रुग्णालयातून हवाई रुग्णवाहिकेतून मुंबईला आणण्यात आले. मुंबईत त्याच्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीवर उपचार करण्यात येणार आहेत, असे ‘बीसीसीआय’ सचिव जय शाह यांनी निवेदनात म्हटले आहे. पंतला ३० डिसेंबरला कार अपघातात दुखापत झाली होती. ‘बीसीसीआय’ने हवाई रुग्णवाहिकेतून त्याला मुंबईला आणण्याचा निर्णय घेतला, कारण कोणत्याही व्यावसायिक विमानातून प्रवास करण्याच्या स्थितीत तो नव्हता.
आणखी वाचा – तू लढवय्या आहेस, लवकरच यातून बरा होशील.
‘‘३० डिसेंबरला झालेल्या कार अपघातानंतर डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पंतला हवाई रुग्णवाहिकेच्या मदतीने मुंबईत आणले जाईल. त्याला कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन संस्थेत नेण्यात येणार आहे. स्पोर्ट्स मेडिसिन विभागाचे प्रमुख आणि अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. दिनशॉ परदीवाला यांच्या निगराणीखाली त्याच्यावर उपचार करण्यात येतील. पंतच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात येईल. यामधून सावरण्याच्या प्रक्रियेदरम्यान ‘बीसीसीआय’चा वैद्यकीय चमू त्याच्यावर लक्ष ठेवून असतील. बोर्ड पंतला यामधून सावरण्यासाठी प्रयत्नशील असेल आणि त्याला सर्वतोपरी मदत केली जाईल,’’ असे शहा यांनी निवेदनात सांगितले.
पंतला कार अपघातात माथ्यावर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली असून त्याच्या गुडघ्यांनाही दुखापत झाली आहे. त्याच्या गुडघ्याची दुखापत ही चिंताजनक आहे. पंत हा ‘बीसीसीआय’च्या केंद्रीय करारातील क्रिकेटपटू असल्याने बोर्डाला त्याच्या उपचारावर खर्च करण्याचा विशेषाधिकार आहे. केंद्रीय अनुबंधित क्रिकेटपटूंच्या खेळासंबंधित दुखापतींवर उपचार ‘बीसीसीआय’कडून निश्चित केलेल्या डॉक्टरांकडून करण्यात येते आणि डॉ. नितीन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत क्रीडा आणि वैद्यकीय विज्ञान चमू यांच्या देखरेखीखाली खेळाडूंचे पुनर्वसन करण्यात येते. पंताला आता ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) खेळता येणार नाही.