भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. २६ डिसेंबरपासून दोन्ही संघात पहिला कसोटी सामना खेळला जाईल. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतही या दौऱ्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी सर्वांना अपेक्षा आहे. दरम्यान पंतला त्याआधीच एक चांगली बातमी मिळाली आहे.
ऋषभ पंतला उत्तराखंड सरकारने राज्याचे ब्रँड अॅम्बेसेडर बनवले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी स्वत: पंतला व्हिडिओ कॉलवर याची माहिती दिली. यावर पंतनेही धामी यांचे आभार मानले. पंत सध्या टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिकेत आहे.
हेही वाचा – “वामिका मोठी झाल्यावर आम्ही…”, विराट-अनुष्काची ‘ती’ पोस्ट चर्चेत; ‘या’ कारणासाठी मानले मीडियाचे आभार!
ऋषभ पंतचा जन्म हरिद्वार येथे झाला. नंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पंत यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलून त्यांची विचारपूस केली. उत्तराखंडमध्ये कधी येणार असा सवालही मुख्यमंत्र्यांनी त्याला केला. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ते म्हणाले, ”भारतातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक, युवकांचा आदर्श आणि उत्तराखंडचा सुपुत्र ऋषभ पंतची सरकारने राज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. आपल्या या निर्णयामागचा उद्देश राज्यातील तरुणांना खेळ आणि आरोग्याबाबत जागरुक व्हावे हा आहे.”
ऋषभ पंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
४ ऑक्टोबर १९९७ रोजी जन्मलेल्या ऋषभ पंतने भारतासाठी आतापर्यंत २५ कसोटी, १८ एकदिवसीय आणि ४१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तो रुरकी आणि नंतर दिल्लीहून तो राजस्थानला पोहोचला. नंतर त्याला भारताच्या अंडर-१९ संघात संधी मिळाली आणि त्याने स्वत:ला सिद्ध केले. पंतने आतापर्यंतच्या कारकिर्दीत कसोटीत १५४९, एकदिवसीय सामन्यात ५२९ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये ६२३ धावा केल्या आहेत.