विडिंजविरूद्धच्या अखेरच्या टी-२० सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. पंत आणि कोहलीच्या दमदार फलंदाचीच्या जोरावर अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्याच्या टी-२० मालिकेत निर्भेळ यश मिळवलं आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेल्या पंतने अखेरच्या सामन्यात दमदार पुनरागमन करत, नाबाद ६५ धावांची खेळी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतने ४२ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ६५ धावा केल्या. आतापर्यंत कोणत्याही भारतीय यष्टीरक्षकाला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करता आलेली नाही. याआधी सर्वाधिक धावा धोनीच्या नावावर होत्या. धोनीने २०१७ मध्ये इंग्लंडविरोधात ५६ धावांची खेळी केली होती. हा विक्रम पंतने विंडिजविरोधात मोडीत काढला आहे. याचसोबत टी-२० क्रिकेटमध्ये २२ व्या वर्षाआधी दोन अर्धशतकं झळकावणारा ऋषभ पंत पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे, धोनीने ज्या सामन्यात ५६ धावांची खेळी केली होती त्या सामन्यात पंतने आतंरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण केलं होतं.

पंतच्या या दमदार खेळीमुळे कर्णधार विराट कोहली चांगलाच प्रभावित झाला आहे. सामन्यानंतर कोहलीनं पंतवर कौतुकांचा वर्षाव केला आहे.

विराटने केलं ऋषभचं तोंडभरुन कौतुक –
“ऋषभ पंतकडे आम्ही भारताचं भविष्य म्हणून पाहत आहोत. तो गुणवान खेळाडू आहे. सध्या त्याला अधिकाधीक खेळण्याची संधी दिली गेली पाहिजे, त्याच्यावर दबाव टाकणं योग्य ठरणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्हाला दबाव हाताळता आला पाहिजे. तो असाच खेळत राहिला, तर भारताकडून त्याचं भविष्य उज्वल असेल यात शंका नाही.” असे म्हणत विराटने ऋषभचं तोंडभरुन कौतुक केलं.

आगामी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारताचा हा मालिका विजय आशादायी आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वचषकातील पराभवानंतर निवड समितीने यापुढे ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती असेल हे स्पष्ट केलं होतं. टी-२० मालिकेतील विजयानंतर भारतीय संघ आता ८ ऑगस्टपासून विंडीजविरुद्ध वन-डे मालिका खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेत पंत कशी खेळी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.