भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाल्यानंतर सर्व स्तरातून चिंता व्यक्त करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह क्रिकेट तसेच अन्य क्षेत्रातील दिग्गजांनी तो लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना केली आहे. ऋषभ पंतच्या चेहऱ्याला जखम झाली असून गुडघा, पाठीलाही दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर देहरादूनमधील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान त्याच्या प्रकृतीविषयीची मोठी माहिती समोर आली आहे.
हेही वाचा >> “एवढा पैसा कमवतात मग एक ड्रायव्हर तर …”, ऋषभ पंतच्या कार अपघातावर कपिल देव यांचे मोठे वक्तव्य
ऋषभ पंतवर सध्या तज्ज्ञ डॉक्टर उपचार करत आहेत. ईएसपीएन क्रिकइन्फो या क्रीडाविषयक वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या पाठीचा कणा आणि डोक्याचा एमआरआय करण्यात आला आहे. या एमआरआयचे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. तसेच चेहऱ्यावरील जखमा भरव्यात म्हणून प्लास्टिक सर्जरीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शनिवारी पंतचा गुडघा आणि घोट्याचाही एमआरआय करण्यात येणार आहे.
ऋषभ पंतला कोठे जखम झाली?
हेही वाचा >> “ऋषभ पंतला आईला सरप्राईज द्यायचं होतं, पण…”, उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली माहिती
ऋषभ पंतच्या प्रकृतीविषयी बीसीसीआयने अधिक माहिती दिलेली आहे. या माहितीनुसार ऋषभची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या चेहऱ्यावर दोन ठिकाणी जखम झाली आहे. तसेच गुडघा, घोटा, मनगट, पाठीलाही इजा झाली आहे. अगोदर त्याला सक्षम हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला देहरादूनमधील मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा >> चेहऱ्याला जखमा, गुडघ्याला दुखापत, ऋषभ पंतची प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषभ पंतच्या आईला फोन करून त्याच्या प्रकृतीविषयी चौकशी केली. तसेच ट्वीटद्वारे अपघाताचे वृत्त ऐकून दु:ख झाल्याची भावना व्यक्त केली.