विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघ आता आपल्या आगामी दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. ३ ऑगस्टपासून भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ टी-२०, ५ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. मात्र नवीन दौऱ्याआधीही भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोण करणार हा प्रश्न सुटलेला नाहीये. विश्वचषक स्पर्धेत फलंदाजीच्या क्रमावरुन मोठं रामायण घडलं होतं, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला त्याचा फटकाही बसला. मात्र महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थिती भारतीय संघात जागा मिळालेल्या यष्टीरक्षक ऋषभ पंतने, आपण चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सज्ज असल्याचं म्हटलं आहे.

अवश्य वाचा – भारतीय संघाला बदलाची गरज, प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेल्या रॉबिन सिंहचा शास्त्रींवर निशाणा

“मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडते. माझ्यासाठी ही गोष्ट नवीन नाहीये, याआधीही मी आयपीएमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलो आहे. मी या जागेसाठी सरावही करत आहे. मी कोणत्याही एका शैलीत खेळत नाही, सामन्याची गरज असले तसं खेळण्याचा माझा प्रयत्न असतो. लोकं माझ्याबद्दल काय म्हणतायत याचा मला फरकं पडत नाही, मी वर्तमानपत्र फारसा वाचत नाही.” हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पंत बोलत होता.

वन-डे, टी-२० की कसोटी याबद्दल मी फारसा विचार करत नाही. मी कसोटी क्रिकेट आधी खेळल्यामुळे मला याचा थोडा फायदा मिळतोय. कसोटी क्रिकेट हा खडतर प्रकार मानला जातो. पण यामुळेच मी डावाला आकार कसा द्यायचा, परिस्थितीनुरुप कसं खेळायचं हे शिकलो. कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवशी तुम्हाला नवीन शिकायला मिळतं. वन-डे आणि टी-२० क्रिकेटमध्ये गोष्टी पटापट घडत जातात, त्यामुळे तुम्हाला फारसा वेळ मिळत नाही. ऋषभ आपल्या फलंदाजीविषयी बोलत होता.

Story img Loader