डेहराडून : कार अपघातात गंभीर जखमी झालेला भारताचा यष्टिरक्षक- फलंदाज ऋषभ पंतच्या प्रकृतीत झपाटय़ाने सुधारणा होत असून, सोमवारी त्याला अतिदक्षता विभागाबाहेर हलवण्यात आले.
‘‘पंतची प्रकृती एकदम चांगली आहे. पंतच्या प्रकृतीत झपाटय़ाने सुधारणा दिसल्यामुळे रविवारी रात्रीच त्याला अतिदक्षता विभागातून बाहेर हलविण्यात आले. मात्र पंतच्या पायाला होणाऱ्या वेदना कायम आहेत. पंतची ‘एमआरआय’ चाचणी करण्याचा सध्या विचार नाही,’’ असे पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
India vs Sri Lanka : भारत विरुद्ध श्रीलंका पहिला ट्वेन्टी-२० सामना कधी? कुठं मोफत पाहता येणार
कार अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर पंतला शुक्रवारी डेहराडून मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रस्त्यावरील खड्डा चुकवताना पंतचा कारवरील ताबा सुटला आणि अपघात घडल्याचे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी रविवारी रुग्णालयात पंतची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) संचालक श्याम शर्मा यांनीही पंतची रुग्णालयात भेट घेतली होती.
पंतवरील उपचार आणि त्याच्या प्रकृतीविषयी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सातत्याने पाठपुरावा घेत आहे. पंतच्या उपचारावरील सर्व खर्च ‘बीसीसीआय’च्या वतीनेच करण्यात येणार आहे. पंतची प्रकृती सुधारत असली, तरी अपघातात गुडघा आणि घोटय़ाला झालेल्या दुखापतीमुळे पंतला किमान सहा महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका आणि ‘आयपीएल’ स्पर्धेला मुकणे अपेक्षित आहे.