Rishabh Pant Auction Viral Post: आयपीएल २०२५ पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. या लिलावापूर्वी BCCI नवे नियम जारी केले होते. या कालावधीत बोर्डाने अनेक नियमांमध्ये बदल करून संघांना देण्यात येणारी एकूण रक्कमही वाढवली आहे. नवीन नियम जाहीर केल्यानंतरही, अद्याप कोणत्याही संघाने रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केलेली नाही. अनेक स्टार खेळाडूंनी जुना संघ सोडल्याचीही चर्चा आहे. याचदरम्यान ऋषभ पंतने एक्सवर पोस्ट करत दिल्ली कॅपिटल्सला चांगलाच धक्का दिला आहे.
ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्स संघ सोडू शकतो अशीही अफवा आहे. चेन्नई सुपर किंग्जपासून ते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूपर्यंत संघांशी त्याचे नाव जोडले गेले आहे. या बातम्यांदरम्यान पंतने त्याच्या चाहत्यांना लिलावात जाण्याबाबत प्रश्न विचारून खळबळ उडवून दिली आहे.
ऋषभ पंत २०१६ पासून दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. कार अपघातानंतर पुनरागमन केल्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली संघाने चमकदार कामगिरी केली. मात्र, संघ आयपीएल २०२४ च्या प्लेऑफपासून केवळ एक पाऊल दूर राहिला. दिल्ली संघाने बेंगळुरू आणि चेन्नईप्रमाणे समान संख्येने सामने जिंकले होते, परंतु नेट रन रेटमुळे मागे राहिले. पण आता पुढील लिलावापूर्वी पंतने चाहत्यांना प्रश्न केला आहे. पंतने विचारले, ‘मेगा ऑक्शन मध्ये मी जर उतरलो तर मला कोणी करारबद्ध करेल की नाही आणि कितीची बोली लागेल?, या त्याच्या प्रश्नाने दिल्ली संघाच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पंतच्या या प्रश्नाला अनेक चाहत्यांनी उत्तर दिले. काहींना २० कोटी, काहींनी १८ कोटी, तर काही चाहत्यांनी १२ कोटींहून अधिक मिळण्याची आशा व्यक्त केली. दिल्ली फ्रँचायझीने ऋषभ पंतला १६ कोटींमध्ये रिटेन केले होते. पंतच्या या प्रश्नानंतर तो आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावामध्ये उतरणार असल्याचा इशारा त्याने दिल्याचे चाहते म्हणत आहेत.
नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान आयपीएल मेगा लिलाव होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये अनेक स्टार खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागणार आहे. याआधी, संघांना ३० ऑक्टोबरपर्यंत रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे आणि आतापर्यंत कोणत्याही फ्रेंचायझीने ही यादी जाहीर केलेली नाही.