4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर 2-1 ने मात केल्यानंतर भारतीय संघ आता वन-डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. शनिवारपासून दोन्ही संघांमध्ये 3 वन-डे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. मात्र या मालिकेसाठी यष्टीरक्षक ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आलेली आहे त्यामुळे मे महिन्यात इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी पंतचा विचार होणार की नाही यावर चर्चांना उधाण आलं होतं. मात्र भारतीय संघाचे निवडसमिती प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी विश्वचषकासाठी पंतचा नक्की विचार करण्यात येईल असं म्हटलं आहे.

“आतापर्यंत आम्ही ज्या ज्या यष्टीरक्षकांना संधी दिली आहे, त्यांनी कमी-अधिक प्रमाणात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे ऋषभ पंतचा विश्वचषकासाठी नक्की विचार केला जाईल. खेळाडूंवर अति क्रिकेटचा भार येणार नाही, याचसाठी त्याला वन-डे मालिकेत विश्रांती देण्यात आलेली आहे.” Indian Today वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद बोलत होते. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेसाठी पंतचा संघात समावेश करण्यात आलेला नाहीये. मात्र टी-20 सामन्यांसाठी पंत भारतीय संघात असणार आहे.

अवश्य वाचा – ऋषभ पंतचं भविष्य उज्वल – सौरव गांगुली

कसोटी मालिकेला ऋषभला दुखापत झाल्याची माहितीही प्रसाद यांनी दिलं. या दुखापतीचं स्वरुप गंभीर नसलं तरीही सध्या त्याला आरामाची गरज आहे. त्यामुळे आगामी काळात तो दमदार पुनरागमन करेल अशी मला आशा असल्याचंही प्रसाद म्हणाले. कसोटी मालिकेत ऋषभ पंतने सर्वाधिक धाव काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरं स्थान पटकावलं होतं. याचसोबत एका कसोटी मालिकेत यष्टींमागे 20 झेल घेत त्याने सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रमही मोडीत काढला आहे.

Story img Loader