विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यावर आपलं वर्चस्व राखलं. महेंद्रसिंह धोनीने विंडीज दौऱ्यातून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऋषभ पंतला भारतीय संघात जागा देण्यात आली. यापुढे ऋषभ पंत भारताचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक असेल हे निवड समितीने स्पष्टही केलं होतं. मात्र विंडीज दौऱ्यात फलंदाजीमध्ये ऋषभला आपली छाप पाडता आली नाही. मर्यादीत षटकांच्या सामन्यात ऋषभला महत्वाच्या चौथ्या जागेवर संधी देण्यात आली होती. मात्र तिकडेही तो अपयशी ठरला. असं असलं तरीही ऋषभने यष्टीरक्षणात आपली छाप पाडली असून, धोनीला मागे टाकलं आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने आपलं कसोटी कारकिर्दीतलं यष्टींमागे बळीचं अर्धशतक पूर्ण केलं. या कामगिरीसह पंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५० बळी घेणारा यष्टीरक्षक ठरला आहे. त्याने आपल्या ११ व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली आहे, धोनीला ही कामगिरी करण्यासाठी १५ कसोटी सामने लागले होते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५० बळी घेणारे यष्टीरक्षक पुढीलप्रमाणे,
- मार्क बाऊचर (दक्षिण आफ्रिका) – १० कसोटी
- जॉनी बेअरस्टो (इंग्लंड) – १० कसोटी
- टीम पेन (ऑस्ट्रेलिया) – १० कसोटी
- अॅडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया) – ११ कसोटी
- ऋषभ पंत (भारत) – ११ कसोटी
- महेंद्रसिंह धोनी (भारत) – १५ कसोटी
दरम्यान, विंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ टी-२० आणि ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. १५ सप्टेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे.