येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी २० क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सर्व संघांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भारतीय संघदेखील प्रत्येक सामना विश्वचषकाचा विचार करूनच खेळत आहे. या दरम्यान, भारतीय संघातील धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंतचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. भारतीय संघामध्ये विश्वचषकाबद्दल काही प्रमाणात अस्वस्थता असल्याचे पंत म्हणाला आहे.

बुधवारी (१८ ऑगस्ट) एका कार्यक्रमादरम्यान ऋषभ पंतला आशिया चषक आणि टी २० विश्वचषकाबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी तो म्हणाला, “विश्वचषक जवळ आल्याने संपूर्ण संघ थोडा अस्वस्थ आहे. असे असले तरी, एक संघ म्हणून आम्हाला आमचे शंभर टक्के योगदान देणे आवडते. विश्वचषकातही आम्ही हीच गोष्ट करू शकतो.”

हेही वाचा – ‘शाळा गेली चुलीत!’, किशोरवयीन चाहत्याच्या उत्तराने केएल राहुल झाला थक्क

२०१३ चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताने कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. गेल्या वर्षी (२०२१) युएईमध्ये झालेल्या टी २० विश्वचषकातही भारतीय संघाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे यावर्षी टी २० विश्वचषक जिंकून संघ आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक आहे. याबाबत ऋषभ पंत म्हणाला, “आम्हाला आशा आहे, सर्वोत्कृष्ट खेळ करून आम्ही अंतिम सामन्यात पोहचू.”

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत ऋषभ पंतने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियात चांगला खेळ खेळण्याबाबत पंतला स्वत:वर विश्वास आहे. पंतने प्रतिष्ठित मेलबर्न क्रिकेट ग्राउंडचे कौतुक केले. आगामी टी २० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना याच ऐतिहासिक मैदानावर होणार आहे.

Story img Loader