Rishabh Pant Gives Special Gift To Savers of Life in Car Accident: ऑस्ट्रेलियात विस्फोटक खेळी करत गाबाचा घमंड मोडणारा भारताचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणजे ऋषभ पंत. जीवघेण्या अपघातातून सावरल्यानंतर पंतने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्याच कसोटीत संघासाठी पहिल्या डावात महत्त्वपूर्ण खेळी केली. पण एक वेळ अशी होती की ऋषभ पंत पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार की नाही, याबाबत सर्वांनाच शंका होती. याचं कारण म्हणजे पंतचा जीवघेणा अपघात.
३० डिसेंबर २०२२ हा दिवस ऋषभ पंतसाठी एखाद्या दुस्वप्नासारखा ठरला. याच दिवशी ऋषभ पंतचा रस्ते अपघात झाला होता. पंत दिल्लीहून डेहराडूनला आपल्या घरी जात होता. त्यावेळेस त्याची कार दिल्ली-डेहराडून महामार्गावरील दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर कारला आग लागली. पण एवढा गंभीर अपघात होऊनही ऋषभ पंतने मृत्यूला हरवलं आणि साखर कारखान्यात काम करणारे दोन जण त्याच्यासाठी देवदूत बनून आले. रजत आणि निशू अशी या दोघांची नावे असून त्यांनी वेळीच पंतला कारमधून बाहेर काढलं आणि रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. या दुर्घटनेतून वाचल्यानंतर ऋषभ पंतने दोघांना खास गिफ्ट दिलं आहे. याबाबत ऑस्ट्रेलियन मीडियाने एक स्पेशल रिपोर्ट दिला आहे.
ऋषभ जेव्हा या जीवघेण्या रस्ते अपघातातून पंत बरा झाला, तेव्हा त्याने पहिल्यांदा रजत आणि निशूची भेट घेतली. पंतने या दोघांनाही एक स्कूटी भेट दिली आहे, जी ते दोघे आजही चालवतात. या दोघांच्या स्कूटीवर फक्त ऋषभ पंतचं नावदेखील लिहिलं आहे. आजही पंत या दोघांचा ऋणी आहे, कारण त्याच्यामुळेच पंतचे प्राण वाचले आणि तो क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकला. पंत सध्या ऑस्ट्रेलियात असून पर्थ कसोटीत खेळत आहे.
ऋषभ पंतशी संबंधित ऑस्ट्रेलियन मीडियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऋषभ पंतचे चाहते रजत आणि नीशूचे कौतुक करत आहेत. हे दोघे नसते तर त्या दिवशी मोठा अनर्थ घडला असता. मात्र, अपघातातून बचावल्यानंतर पंतने अप्रतिम पुनरागमन केले. ऋषभ पंतच्या अपघातानंतर त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि यानंतर पुनरागमनासाठी ऋषभ पंतने शर्थीचे प्रयत्न करत यशस्वी पुनरागमन केले. पंतने आयपीएलमधून पुनरागमन करत चांगली कामगिरी केली. यानंतर त्याने कसोटी क्रिकेटमध्येही आपला फॉर्म दाखवून दिला. यानंतर टी-२० वर्ल्डकप विजेत्या संघाचा तो भागही होता.