Rishabh Pant broke Kapil Dev record in IND vs NZ 1st Test : बंगळुरू कसोटी सामन्यात दुखापत झाल्यानंतर चौथ्या दिवशी भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत फलंदाजीला आला. तेव्हा त्याने आपल्या बॅटने मोठी कामगिरी केली. पंतला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विकेट कीपिंग करताना गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर चौथ्या दिवशी फलंदाजीला उतरत सर्फराझसह दमदार फटकेबाजी केली. त्याने सर्फराझच्या शतकानंतर आपले अर्धशतक झळकावले. या खेळीत त्याने तीन षटकार मारत भारताच्या विश्वचषक विजेत्या कर्णधाराचा विक्रम मोडला.
ऋषभ पंतने मोडला कपिल देवचा विक्रम –
पावसामुळे खेळ थांबला तोपर्यंत पंतने ५६ चेंडूत ५३ धावांची खेळी केली होती. यावेळी त्याने तीन षटकारही ठोकले, ज्याच्या जोरावर त्याने भारतीय संघाचा महान माजी कर्णधार कपिल देवचा मोठा विक्रम मोडला. ऋषभ पंतने दुसऱ्या डावात आतापर्यंत तीन षटकार ठोकले आहेत, ज्यामुळे तो आता कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. पंतने या बाबतीत कपिल देवला मागे टाकले आहे, ज्याने १३१ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ६१ षटकार मारले होते. तर पंतच्या नावावर आतापर्यंत ६२ षटकारांची नोंद झाली आहे. या यादीत वीरेंद्र सेहवाग पहिल्या स्थानावर आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये १०३ सामन्यात ९० षटकार ठोकले आहेत.
भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे खेळाडू :
वीरेंद्र सेहवाग – ९०
रोहित शर्मा – ८८
एमएस धोनी – ७८
सचिन तेंडुलकर – ६९
रवींद्र जडेजा – ६६
ऋषभ पंत – ६२
कपिल देव -६१
एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला –
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत जगात ऋषभ पंत सध्या २८व्या स्थानावर आहे, तर बंगळुरू कसोटी सामन्यात जर त्याने त्याच्या डावात आणखी ३ षटकार मारले, तर तो कार्ल हूपर आणि एबी डिव्हिलियर्स या दोघांनाही मागे टाकू शकेल ऋषभ पंतने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात आतापर्यंत एकूण ४५ षटकार ठोकले आहेत.