Rishabh Pant Helps Student to For Enginnering Fees Via Social media Post: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. २०२२ च्या अखेरीस कार अपघातात जखमी झाल्यानंतर, पंतने क्रिकेटच्या मैदानावर जोरदार पुनरागमन केले आणि टी-२० विश्वचषक २०२४चे विजेतेपद जिंकणाऱ्या संघाचा भागही झाला. या स्पर्धेत ऋषभ पंतने चांगली कामगिरी करत आपल्या खेळीने छाप पाडली. पंत सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय आहे. दरम्यान, पंतबाबत एक मोठी बातमी समोर येत असून ही बातमी सोशल मीडियावरून समोर आली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत एका मुलाने कॉलेजची फी भरण्यासाठी आर्थिक मदत मागितली. या मुलाने भारतीय खेळाडूला पैसे परत करणार असल्याचेही सांगितले. त्याने एक्सवर केटो लिंक शेअर केली आणि ऋषभ पंतला टॅग केले. युजरच्या या पोस्टनंतर काही वेळातच पंतनेही त्याला प्रत्युत्तर दिले. भारतीय यष्टीरक्षक-फलंदाजाने विद्यार्थ्याच्या फीसाठी ९० हजार रूपये देऊ केल्याचे म्हटले जात आहे. याबद्दल त्या मुलाने पंतचे आभारही मानले.
हेही वाचा – जय शाह यांची मोठी घोषणा; BCCIकडून भारतीय क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस, बक्षीस रक्कम जाहीर
सोशल मीडियावर मदत मागणारा मुलगा नोकरी करत त्याचे शिक्षण पूर्ण केरत आहे. त्याने क्राऊड फंडिंगसाठीही मेसेज केला होता. True India Scenes या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली होती. यानंतर पंतने त्याची एका सेमिस्टरची फी भरली आहे. यानंतर पंतने ट्विट केले की, ‘तुझी स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास कायम ठेव… देव नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मदत करत असतो. काळजी घे.’ पण ऋषभ पंतकडे ज्या मुलाने मदत मागितली ते ट्विट आता डिलीट करण्यात आलं आहे. त्यामुळे ही घटना खरी आहे की पंतची फसवणूक झाली आहे, अशा चर्चाही सुरू आहेत.
ऋषभ पंत सध्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. पुरानी दिल्ली 6 संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या सामन्यात पंतची बॅट तळपली नाही पण जर संघ बाद फेरीत गेला तर तो खेळताना दिसेल. यानंतर पंत दुलीप ट्रॉफीमध्येही खेळताना दिसणार आहे.