Rishabh Pant IPL 2025 Records: भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने माजी कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. आयपीएल २०२५ च्या लिलावात लखनौ सुपर जायंट्सने रेकॉर्डब्रेक बोली लावत खरेदी केल्यानंतर ऋषभ पंतने हा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरने बीसीसीआयचा करार नसतानाही भारताचा कर्णधार रोहित शर्माला मागे टाकून सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत तिसरे स्थान पटकावले.
जेद्दाह येथे झालेल्या आयपीएल २०२५ पूर्वीच्या महालिलावात पंतला LSG ने २७ कोटींच्या मोठ्या किंमतीला करारबद्ध केले. त्यामुळे आयपीएल २०२४ च्या लिलावात कोलकाताने मिचेल स्टार्कसाठी २४.७५ कोटींच्या विक्रमी बोलीचा रेकॉर्ड मागे टाकला. २७ कोटींच्या मोठ्या बोलीसह ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
ऋषभ पंत क्रिकेटमधून सर्वाधिक कमाई करणारा भारतीय क्रिकेटपटू
२७ कोटींची आयपीएल डील आणि बीसीसीआय करारामुळे पंत हा भारताचा सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू बनला आहे. पंतला बीसीसीआयने वार्षिक करारामध्ये ग्रेड-बीमध्ये ठेवले आहे, ज्यामुळे त्याला टीम इंडियासाठी खेळण्याकरता वार्षिक ३ कोटी रुपये मिळतात. २७ आणि ३ कोटी रुपये मिळून पंतचे एकूण उत्पन्न ३० कोटी रुपये झाले आहे. पंतचा अलीकडचा फॉर्म आणि सातत्यपूर्ण कामगिरी लक्षात घेता, भारतीय क्रिकेट बोर्डाच्या पुढील वार्षिक करारामध्ये यष्टीरक्षक फलंदाजाला ग्रेड-A किंवा A+ मध्ये बढती मिळू शकते.
कार अपघातामुळे डिसेंबर २०२२ पासून क्रिकेटपासून पंत दूर होता त्यामुळे बीसीसीआयने पंतला बी श्रेणीत ठेवण्यात आले होते. नाहीतर या आधी तो ग्रेड A श्रेणीचा भाग होता आणि BCCI पुढील मार्चमध्ये नवीन करार यादी जाहीर करेल तेव्हा पंतला नक्कीच बढती मिळेल.
पंतने यासह सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत कोहलीला मागे टाकलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने विराटला आयपीएल २०२५ साठी २१ कोटींना संघात कायम ठेवले. BCCI च्या वार्षिक करारा यादीत A+ ग्रेडचा भाग असल्याने विराटला ७ कोटी रूपये मिळतात. २१ आणि ७ कोटी रुपये मिळून विराटची एकूण कमाई २८ कोटी रुपये आहे. तर, रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने १६.३ कोटींमध्ये रिटेन केले आहे. भारतीय कर्णधार देखील A+ श्रेणीचा भाग आहे, ज्यामुळे त्याला ७ कोटी रुपये मिळतात. म्हणजेच रोहितची एकूण कमाई २३.३ कोटी रुपये आहे. यासह ऋषभ पंत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
श्रेयस अय्यरने सर्वाधिक कमाईच्या बाबतीत रोहित शर्माला टाकलं मागे
श्रेयस अय्यर आणि इशान किशन हे दोन खेळाडू होते ज्यांना २०२३-२४ च्या BCCI करार सूचीमधून काढून टाकण्यात आले होते. याचे कारण म्हणजे त्यांनी राष्ट्रीय कर्तव्यापासून दूर असताना देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागासाठी सर्व भारतीय खेळाडूंसाठी बंधनकारक असलेल्या बोर्डाच्या आदेशाचे उल्लंघन केले.
आयपीएल कर्णधार विजेत्या असलेल्या श्रेयस अय्यरला आयपीएल २०२५ च्या लिलावातील मोठ्या बोलीसह सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत बुमराह आणि रोहित या दोघांनाही मागे टाकले. लिलावात श्रेयस अय्यरला २६.७५ कोटींमध्ये विकत घेतले, ज्यामुळे तो IPL इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू बनला.
क्रिकेटमधून सर्वाधिक कमाई करणारे भारतीय क्रिकेटपटू (Highest Paid Indian Cricketers List)
ऋषभ पंत – ३० कोटी
विराट कोहली – २८ कोटी
श्रेयस अय्यर – २६.७५ कोटी
जसप्रीत बुमराह – २५ कोटी
रवींद्र जडेजा – २५ कोटी
रोहित शर्मा – २३.३ कोटी