Rishabh Pant Century : भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या अर्धवट राहिलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना आजपासून (१ जुलै) सुरू झाला आहे. बर्मिंगहॅममधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवरती हा सामना सुरू आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाच्या डावाची सुरुवात अतिशय वाईट झाली. १०० धावांच्या आतच सुरुवातीचे पाच फलंदाज तंबूत परतले. त्यामुळे भारतीय संघ मोठ्या संकटात सापडला होता. मात्र, उपकर्णधार ऋषभ पंतने संयमी खेळी करत शानदार शतक केले.

जेम्स अँडरसन आणि मॅथ्यू पॉट्सच्या अचूक गोलंदाजी माऱ्यासमोर भारतीय फलंदाज तग धरू शकले नाही. दोन्ही सलामीवीरांना जेम्स अँडरसनने अगदी स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर आलेला हनुमा विहारी, विराट कोहली आणि श्रेयस अय्यरदेखील विशेष काही करू शकले नाही. त्यामुळे भारतीय डाव संकटात आला होता. पण, अशा संकटाच्यावेळी उपकर्णधार ऋषभ पंतने रविंद्र जडेजाला हाताशी धरून डावा सावरला. या दरम्यान त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक पूर्ण केले. त्याने ८९ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. यामध्ये चौकारांचा १५ आणि एका षटकाराचा समावेश आहे.

गेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरला आहे. पाचव्या क्रमांकावर येऊन त्याने सातत्याने चांगला खेळ केला आहे. आताही त्याने डाव सावरण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यामुळे क्रिकेट चाहते त्याचे कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर तर त्याच्या कौतुकासाठी चाहत्यांनी पोस्ट केल्या आहेत.

हेही वाचा – VIDEO : बुमराहचा लहानगा फॅन बघितला का? बोबड्या शब्दांमध्ये करतोय चिअर

काही दिवसांपूर्वीच ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय टी २० संघाने मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी २० मालिका बरोबरीत राखण्यात यश मिळवले होते. याशिवाय, पंतने इंडियन प्रीमियर लीगमध्येही चांगली कामगिरी केली होती.

Story img Loader