Rishabh Pant Injured and Went Off Field IND vs NZ Test: भारतीय संघाच्या फलंदाजीतील साधारण कामगिरीनंतर आता टीम इंडियाला मोठा फटका बसला आहे. ऋषभ पंतला लाईव्ह सामन्यात दुखापत झाल्याने तो मैदानाबाहेर गेला आहे. ऋषभ पंतच्या जागी ध्रुव जुरेल विकेटकिपिंगसाठी मैदानात आला आहे. विकेटकीपिंग करताना पंतला ही दुखापत झाली. मात्र, दुखापत किती गंभीर आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. पंतला चालत त्रास होत होता आणि तो फिजिओचा आधार घेत चालताना दिसला.
प्रथम, टीम इंडियाने घरच्या मैदानावर खेळताना आपली सर्वात कमी धावसंख्या केली आणि त्यानंतर, जेव्हा न्यूझीलंडचा संघ प्रत्युत्तरात फलंदाजीसाठी आला तेव्हा त्यांनी शानदार फलंदाजीला सुरूवात केली. पण दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी ऋषभ पंतला झालेली दुखापत टीम इंडियासाठी मोठा धक्का देणारी आहे. फक्त ऋषभ पंतने या सामन्यात भारताकडून २० धावांची खेळी केली होती. याचबरोबर विकेटकिपिंगमध्येही पंत उत्कृष्ट कामगिरी करताना दिसला आहे.
हेही वाचा – IND vs NZ: भारताच्या वाताहतीला ‘हे दोन’ निर्णय कारणीभूत, रोहित शर्माच्या निर्णयाचा बसला मोठा फटका, तर विराट…
ऋषभ पंतला दुखापत कशी झाली? नेमकं काय घडलं?
न्यूझीलंडच्या डावाच्या ३७व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ऋषभ पंतला दुखापत झाली. रवींद्र जडेजा गोलंदाजी करत होता, समोर न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे होता. जडेजाने हा चेंडू कॉनवेच्या फूटमार्कजवळ टाकला आणि चेंडू अचानक वेगाने फिरला. कॉनवेने ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो चुकला. चेंडू ऑफ स्टंपजवळ आला आणि यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या गुडघ्याला लागला. चेंडू लागताच पंत जमिनीवर पडला आणि वेदनेने कळवताना दिसला.
पंतला चेंडू लागल्यानंतर सामना थांबवण्यात आला आणि पंतला पाहण्यासाठी भारतीय संघाचे फिजिओ मैदानात आले. फिजिओने खूप प्रयत्न केले, पण पंतला नीट उभेही राहता येत नव्हते. यानंतर फिजिओच्या सल्ल्यानुसार ऋषभ पंतने पायाचा पॅडही काढला आणि नंतर लगेच दुसरा यष्टिरक्षक ध्रुव जुरेलला आत येण्यास सांगितले. ज्युरेल पॅड घालून मैदानावर आला. मोठी आणि तणावाची गोष्ट म्हणजे ऋषभ पंतचा हाच उजवा गुडघा अपघातात जखमी झाला होता. डिसेंबर २०२२ पासून मैदानाबाहेर राहिल्यानंतर, या डावखुऱ्या खेळाडूने भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेत कसोटी संघात पुनरागमन केले आणि या मालिकेत पंतने चमकदार कामगिरी केली आणि शतकही केले. अपघातानंतर पंतने मोठ्या कष्टाने क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले होते.
हेही वाचा – कोण आहे विल्यम ओ रूक, केएल, विराटला शून्यावर केलं बाद अन् घरच्या मैदानावर भारताची उडवली दाणादाण
कर्णधार टॉम लॅथम १५ धावा करत बाद झाला तर कॉन्वे संधी मिळताच मोठे फटके खेळत भारतासाठी डोकेदुखी ठरला होता. अखेरीस तो अश्विनच्या चेंडूवर ९१ धावांवर क्लीन बोल्ड झाला. विल यंग देखील ३३ धावा करून बाद झाला. सध्या मैदानावर रचिन रवींद्र आणि डॅरिल मिचेलची जोडी आहे. भारताकडून तिन्ही फिरकीपटूंनी म्हणजेच कुलदीप यादव, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.