गयाना येथे खेळवण्यात आलेल्या अखेरच्या टी-२० सामन्यातही भारताने वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात केली आहे. कर्णधार विराट कोहली आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांनी अर्धशतकी खेळी करत भारताच्या विजयात मोलाचाी वाटा उचलला. पहिल्या दोन सामन्यांमध्ये ऋषभ पंत पूर्णपणे अपयशी ठरला होता. मात्र तिसऱ्या सामन्यात ऋषभने दमदार पुनरागमन करत, नाबाद ६५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली चांगलाच प्रभावित झाला आहे.

अवश्य वाचा – Ind vs WI : ऋषभ पंत फॉर्मात परतला, अखेरच्या सामन्यात विक्रमी खेळीची नोंद

“ऋषभ पंतकडे आम्ही भारताचं भविष्य म्हणून पाहत आहोत. तो गुणवान खेळाडू आहे. सध्या त्याला अधिकाधीक खेळण्याची संधी दिली गेली पाहिजे, त्याच्यावर दबाव टाकणं योग्य ठरणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्हाला दबाव हाताळता आला पाहिजे. तो असाच खेळत राहिला, तर भारताकडून त्याचं भविष्य उज्वल असेल यात शंका नाही.” विराटने ऋषभचं तोंडभरुन कौतुक केलं.

आगामी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारताचा हा मालिका विजय आशादायी आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वचषकातील पराभवानंतर निवड समितीने यापुढे ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती असेल हे स्पष्ट केलं होतं. टी-२० मालिकेतील विजयानंतर भारतीय संघ आता ८ ऑगस्टपासून विंडीजविरुद्ध वन-डे मालिका खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेत पंत कशी खेळी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader