यष्टीरक्षक ऋषभ पंतचा फलंदाजीतला खराब फॉर्म हा गेले काही दिवस भारतीय संघातला चर्चेचा विषय बनला आहे. विंडीज पाठोपाठ आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेतही ऋषभ पंत अपयशी ठरला. अनेक माजी भारतीय खेळाडूंनी ऋषभच्या फलंदाजीत क्रमात बदल करण्याचा सल्ला दिला, तर काही खेळाडूंनी ऋषभला विश्रांती देत संजू सॅमसनला संघात स्थान देण्याची मागणी केली. मात्र भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने ऋषभ पंतला आपला पाठींबा दिला आहे.

“विश्वचषकादरम्यान मधल्या फळीतल्या फलंदाजीविषयी सुरु झालेली चर्चा आता पुन्हा होऊ लागली आहे. मात्र माझ्यामते विराट कोहलीने याकडे फारसं लक्ष देऊ नये. सध्या भारतीय संघात अनेक तरुण खेळाडू आहेत, कर्णधार या नात्याने त्याने सर्वांना पाठींबा द्यायला हवा. विशेषकरुन ऋषभ पंतला मिळालेली संधी ही माझ्यामते सर्वोत्तम गोष्ट आहे. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये ऋषभ भारतासाठी योग्य आहे.” टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात लिहीलेल्या कॉलममध्ये गांगुलीने आपलं मत मांडलं.

प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली ऋषभच्या खराब फलंदाजीमुळे चिंतेत आहे. २ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतला विश्रांती देत वृद्धीमान साहाला संधी देण्याच्या विचारात आहे. याचसोबत निवड समितीनेही ऋषभ पंतसाठी पर्यायांचा विचार केला असून आफ्रिकेविरुद्धची मालिका ऋषभसाठी अखेरची संधी असल्याचं समजतं आहे. त्यामुळे आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ऋषभला भारतीय अंतिम संघात स्थान मिळतंय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader