पीटीआय, नवी दिल्ली
भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या गुडघ्यावर मुंबईच्या रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी याबाबत माहिती दिली. पंतला गेल्या आठवडय़ात झालेल्या कार अपघातात दुखापत झाली होती.‘‘पंतच्या गुडघ्याच्या ‘लिगामेंट’वर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तो सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे. डॉ. परदीवाला तसेच, ‘बीसीसीआय’चा वैद्यकीय चमू त्याच्यावर लक्ष ठेवून असतील,’’ अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिली.
पंतवर ही शस्त्रक्रिया मुंबईच्या अंधेरी पश्चिम येथील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात स्पोर्ट्स मेडिसिन विभागाचे प्रमुख आणि अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. दिनशॉ परदीवाला यांच्या निगराणीखाली करण्यात आली.पंतला डेहराडून येथील रुग्णालयातून हवाई रुग्णवाहिकेतून मुंबईला आणण्यात आले, कारण कोणत्याही व्यावसायिक विमानातून प्रवास करण्याच्या स्थितीत तो नव्हता. पंतला ३० डिसेंबरला कार अपघातात दुखापत झाली होती.