काल (९ जून) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने सात गडी राखून भारताचा पराभव केला. या पराभवामुळे सलग १३ विजय मिळवण्याचा विक्रम करण्यापासून भारतीय संघ वंचित राहिला. काल कर्णधार म्हणून आपला पहिला सामना खेळणाऱ्या ऋषभ पंतच्या नावे एक नकोशा गोष्टीची गोष्टीची नोंद झाली. कर्णधार म्हणून आपला पहिलाच सामना गमावण्याबाबतीत पंतने माजी कर्णधार विराट कोहलीची बरोबरी केली.

दक्षिण आफ्रिकेचा संघ पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला आहे. मालिकेतील पहिला सामना काल दिल्लीमध्ये झाला. या पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघाचा कर्णधार के एल राहुल दुखापतीमुळे बाहेर पडला. अशा परिस्थितीमध्ये ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करणारा तो दुसरा सर्वात तरुण कर्णधार ठरला. यापूर्वी, सुरेश रैना सर्वात तरुण कर्णधार ठरला होता.

हेही वाचा – Happy Birthday David Miller : प्रतिस्पर्ध्यांच्या घशातून विजय हिसकावून घेणारा ‘किलर’ फलंदाज

भारताने पाहुण्यांसमोर २११ धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय गोलंदाज आपल्या धावसंख्येचा बचाव करू शकले नाहीत. डेव्हिड मिलरच्या ३१ चेंडूत नाबाद ६४ धावा आणि रॅसी व्हॅन डर डुसेनच्या नाबाद ७५ धावांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने केवळ १९.१ षटकांतच हे लक्ष्य गाठले. आणि ऋषभ पंतला कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

कर्णधार म्हणून पहिला टी ट्वेंटी सामना गमावणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, विराट कोहलीच्या नावावर अशा घटनेची नोंद आहे. कोहलीने २०१७ मध्ये कानपूर येथे इंग्लंड विरुद्ध कर्णधार म्हणून पहिला टी टवेंटी सामना खेळला होता. त्या सामन्यातही भारताचा सात गडी राखून पराभव झाला होता. विशेष म्हणजे, भारताचा कर्णधार म्हणून पंत आणि कोहली या दोघांनीही पहिल्या सामन्यात वैयक्तिक २९ धावा केल्या.

Story img Loader