Rishabh Pant : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पात्रता फेरीत चमकदार कामगिरी करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उद्या ( गुरुवार, ८ ऑगस्ट) अंतिम सामना पार पडणार आहे. मात्र,त्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतने निरज चोप्रासाठी समाज माध्यमावर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
ऋषभ पंतने एक्स समाज माध्यमावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने नीरज चोप्रासाठी भारतासह जगभरातून पाठिंबा मिळवण्याचे आवाहन केलं आहे. याशिवाय त्याने चाहत्यांना पैसे जिंकण्याची ऑफरही दिली आहे. जर नीरज चोप्राने उद्या सुवर्णपदक जिंकलं तर या पोस्टवर सर्वाधिक लाईक आणि कमेंट करणाऱ्या चाहत्याला पैसे देईन, असं तो म्हणाला. तसेच इतर चाहत्यांनीही विमान तिकीट देणार असल्याचे त्याने म्हटलं आहे.
ऋषभ पंतने पोस्टमध्ये काय लिहिलंय?
जर उद्या नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले, तर या पोस्टवर सर्वाधिक लाईक आणि कमेंट करणाऱ्या चाहत्याला मी एक लाख नव्वद (१०००८९) रुपये देईन. तसेच सर्वाधिक कमेंट करणाऱ्या पहिल्या १० चाहत्यांना विमानाची तिकीटं मिळतील, असं ऋषभ पंत म्हणाला. पुढे त्याने नीरजसाठी भारत आणि जगभरातून पाठिंबा मिळवूया, असं आवाहनही केलं आहे.
८९.३४ मीटर थ्रो फेकून नीरज चोप्राचा अंतिम फेरीत प्रवेश
दरम्यान, पात्रता फेरीत ८९.३४ मीटर थ्रो फेकून नीरज चोप्राने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याचा या मोसमातील सर्वोत्तम थ्रो होता. नीरज बरोबर पाकिस्तानच्या अर्शद नदीमनेही पहिल्याच थ्रोमध्ये अंतिम फेरीसाठी प्रवेश केला आहे. आता अंतिम फेरीत त्याचा सामना भारताच्या नीरजशी होणार आहे.
हेही वाचा – Vinesh Phogat: विनेश फोगट उपांत्य फेरीत, अवघ्या पाऊण तासात दोन बड्या कुस्तीपटूंना दिला धोबीपछाड, पाहा VIDEO
अंतिम फेरीत ‘या’ खेळाडूंशी होणार नीरज चोप्रा सामना
नीरज चोप्रासाठी सुवर्णपदक जिंकणं म्हणावं तितकं सोपं नाही. कारण अंतिम फेरीत नीरजचा सामना अ गटातून पात्र ठरलेल्या ज्युलियन बेव्हरसारख्या बलाढ्य खेळाडूशी होणार आहे. त्याने पात्रता फेरीत ८७.७६ मीटर थ्रो केला होता. ज्युलियन बेव्हर व्यतिरिक्त ज्युलियस येगोने, वाल्देझ जेकब, आणि टोनी केरानन यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.