England vs India 3rd ODI: भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळवण्यात आलेली तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने जिंकली आहे. मँचेस्टरयेथील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या निर्णायक सामन्यात भारताने यजमान इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. यष्टीरक्षक ऋषभ पंतचे धमाकेदार शतक आणि हार्दिक पंड्याची अष्टपैलू कामगिरी, हे या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या हार्दिकला ‘मालिकावीर’ आणि ऋषभ पंतला ‘सामनाविरा’चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सोबत त्यांना क्रिकेटमधील प्रथेप्रमाणे एक शॅम्पेनच्या बाटल्याही देण्यात आल्या. ऋषभ पंत आणि विराट कोहलीने या बाटलीसोबत जे काही केले, ते बघून सर्वांना गंमत वाटली.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ऋषभ पंतने आपल्याला मिळालेली शॅम्पेनची बाटली माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींना भेट दिली. रवी शास्त्रीदेखील लाडक्या विद्यार्थ्याकडून मिळालेल्या भेटीमुळे आनंदी झाल्याचे दिसले. मैदानावरील दोघांची मस्ती बघून चाहत्यांना गंमत वाटली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, ऋषभ पंतप्रमाणे विराट कोहलीनेदेखील शास्त्रींना शॅम्पेन देऊ केली. त्याचाही फोटो व्हायरल होत आहे.
भारताच्या मागील इंग्लंड दौऱ्यावेळी रवी शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. त्यांची आणि संघातील खेळाडूंची चांगली गट्टी होती. प्रशिक्षकपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर शास्त्री पुन्हा समालोचनाकडे वळले आहेत. भारत आणि इंग्लंड एकदिवसीय मालिकेत त्यांनी समालोचकाची भूमिका पार पाडली.
दरम्यान, ऋषभ पंतने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासाठी शानदार कामगिरी केली. त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावून भारताला विजय मिळवून दिला. पंतने ११३ चेंडूत नाबाद १२५ धावांची खेळी केली. ज्यामध्ये १६ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. पंतशिवाय हार्दिक पंड्यानेही चांगली कामगिकी केली. त्याने ५५ चेंडूत ७१ धावा केल्या. गोलंदाजी करताना त्याने इंग्लंडचे चार बळी घेतले होते. या दोघांच्या योगदानामुळे भारताला सामना आणि मालिका दोन्ही जिंकता आले.