Rishabh Pant: वादळी खेळींसाठी प्रसिद्ध यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानात कधी परतणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पण आता सर्वच क्रिकेटप्रेमींसाठी एक छान बातमी समोर आली आहे. ऋषभ पंत आता आयपीएल २०२४ मध्ये खेळणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.कारण आता सौरव गांगुली यांनी ऋषभ पंतच्या पुनरागमनाबाबत मोठी अपडेट दिली आहे. दुसरीकडे पंतही त्याच्या पुनरागमनासाठी त्याच्या फिटनेसकडे खूप लक्ष देत आहे.रिहॅबसाठी ऋषभ पंत सध्या बंगळुरूस्थित एनसीए अर्थात नॅशनल क्रिकेट अकादमीत आहे.
काय म्हणाले सौरव गांगुली?
दिल्ली कॅपिटल्स संघाचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांनी ऋषभ पंतच्या पुनरागमनाबद्दल टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की पंतने स्वत:ला फिट ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) लवकरच पंतला फिट घोषित करू शकते. आम्हाला आशा आहे की एनसीए ५ मार्चला पंतला क्रिकेट खेळण्यासाठी मंजुरी देईल. त्यानंतर कर्णधारपदाबद्दल चर्चा केली जाईल.आम्हाला पंतबद्दल बेफिकीर राहायचे नाही, आम्ही त्याच्याबाबत खूप सावधानता बाळगून आहोत. कारण त्याच्यासमोर अजून खूप मोठे करिअर आहे.
भारताचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत दुखापतीतून सावरण्याच्या मार्गावर आहे. डिसेंबर २०२२ मध्ये एका भीषण कार अपघात झाला, या अपघातात तो गंभीररीत्या जखमी झाला, त्याच्या पायावर शस्त्रक्रियाही करण्यात आली.त्यामुळे पंत वर्षभरापासून मैदानाबाहेर आहे. त्यादरम्यान तो आयपीएल २०२३, डब्ल्यूटीसी फायनल, आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक या प्रमुख स्पर्धांना मुकला आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमधून पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करेल या प्रतिक्षेत चाहते आहेत.