ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेनंतर चर्चेत आलेला भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू ऋषभ पंत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतंच ऋषभ पंतने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नात्याचा खुलासा केला आहे. ऋषभ पंतने गर्लफ्रेंड इशा नेगीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेनंतर ऋषभ पंत सध्या विश्रांती घेत आहे.
ऋषभ पंतने फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, ‘मला फक्त तुला आनंदी ठेवायचं आहे कारण तूच मी आनंदी असण्याचं कारण आहे’. ऋषभ पंतने फोटो टाकल्यानंतर सुरेश रैनाने लगेच फोटोवर कमेंट करत हसतानाच्या इमोजी टाकल्या. ऋषभ पंतने फोटो शेअर केल्यानंतर गर्लफ्रेंड इशानेही तोच फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. ‘माझा जोडीदार, माझा जवळचा मित्र, माझ्या आयुष्यातील प्रेम’, असं इशाने फोटोसोबत लिहिलं होतं.
ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत यावेळी सर्वात जास्त ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा झाली तो म्हणजे ऋषभ पंत. फक्त भारतातच नाही तर ऑस्ट्रेलियातही ऋषभ पंतची चर्चा सुरु होती. मैदानात स्टम्पच्या मागे असो किंवा फलंदाजी करताना दरवेळी ऋषभ पंत आपली छाप पाडत होता. 21 वर्षीय ऋषभ पंतने भारतीय विकेटकिपरने कसोटी मालिकेत सर्वात जास्त झेल घेण्याचा रेकॉर्ड मोडला. चार सामन्यांच्या मालिकेत ऋषभ पंतने 20 झेल घेतले. यासोबत मालिकेत सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चेतेश्वर पुजारानंतर त्याचा नंबर होता.