World Cup 2019 ची सुरुवात ३० मेपासून होणार आहे. १४ जूलैपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धांसाठी प्रत्येक देश आता आपला अंतिम संघ काय असेल? हा विचार करत आहे. टीम इंडियाबाबत बोलताना मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी ऋषभ पंत, विजय शंकर आणि अजिंक्य रहाणे यांना या स्पर्धेसाठी शर्यतीत असल्याचे सांगितले होते. तसेच अजिंक्य रहाणे याला सलामीचा पर्याय म्हणून विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याने ऋषभ पंत याला रोहितबरोबर सलामीला पाठवण्याचे मत व्यक्त केले आहे.

ऋषभ पंत याला संघात स्थान मिळण्याबाबत चर्चा सुरु आहे. त्याला नक्कीच स्थान मिळायला हवे. त्याला संघातून वगळण्याचे एकही कारण मला दिसत नाही. तो फलंदाज म्हणून संघात धोनीसोबत खेळू शकतो. कारण तो एक उत्तम फलंदाज आहे. तो जर रोहितबरोबर सलामीला आला, तर मला ते अधिक आवडेल, असे वॉर्न म्हणाला.

शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी उत्तम आहे. या दोघांनी सलामीला फलंदाजी करत अनेक विक्रम मोडले आहेत. मात्र ऋषभ पंत जर रोहित शर्माबरोबर सलामी फलंदाज म्हणून खेळण्यासाठी मैदानात उतरला तर मला नक्कीच ते आवडेल. प्रतिस्पर्धी संघाला एखादा अनपेक्षित धक्का देण्याच्या दृष्टीने असे बदल करायला काहीच हरकत नाही, असेही वॉर्न म्हणाला.

दरम्यान, २४ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यासाठी टीम इंडियाची १५ फेब्रुवारी रोजी घोषणा होणार आहे. निवड समितीची मुंबई येथे यासाठी बैठक होणार आहे. संघ निवडताना निवड समिती विश्वचषक २०१९चा विचार करुनच संघ निवड करेल, अशी अशा व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader