भारताविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने २ बाद १६६ धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडून पुकोव्हस्की आणि मार्नस लाबूशेनने अर्धशतकं ठोकली. पुकोव्हस्कीने पदापर्णच्या सामन्यात अर्धशतक ठोकलं. महत्त्वाची बाब म्हणजे ऋषभ पंतने दोन वेळा यष्ट्यांमागे त्याचे झेल सोडले. पंतच्या या सुमार कामगिरीमुळे त्याच्यावर चाहत्यांनी आणि नेटीझन्सने प्रचंड टीका केली. इतकंच नव्हे तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टींग यानेही त्याच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले.
“बेटा, तुमसे ना…..”; ऋषभ पंतच्या खराब कामगिरीनंतर भन्नाट मीम्स व्हायरल
ऋषभ पंतने आजच्या दिवसाच्या खेळात दोन झेल सोडले. या मुद्द्यावरून ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्स संघात असताना मार्गदर्शन करणारा माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉन्टींग याने चांगलंच सुनावलं. “मी सुरूवातीपासूनच म्हणतोय की पंतला क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करायची असेल तर त्याला उत्तम किपिंग करणं आधी शिकावं लागेल. इतर कोणत्याही यष्टीरक्षकापेक्षा ऋषभ पंत याने क्रिकेट पदार्पणापासून आतापर्यंत जास्त झेल सोडले आहेत. यावरूनच हे स्पष्ट होतं की त्याला खरंच स्वत:च्या यष्टीरक्षणावर मेहनत घ्यावी लागणार आहे”, असं रोखठोक मत रिकी पॉन्टींगने मांडलं.
Video: झेल टिपण्यासाठी ऋषभ पंतने घेतली हवेत उडी अन्…
“आज पंतने सोडलेले झेल तुलनेने सोपे होते. ते झेल पकडले जायला हवे होते. पंतचं नशिब चांगलं होतं की त्याने झेल सोडल्यानंतरही पुकोव्हस्कीने शतक किंवा द्विशतक झळकावलं नाही. खेळपट्टीची ठेवण पाहता पंतने ते दोन झेल घ्यायला हवे होते. मला खात्री आहे की जेव्हा जेव्हा पंत झेल सोडतो, तेव्हा त्याला मनातून असं वाटत असणार की आता हा फलंदाज मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर वापर करणार. पंतच्या सुदैवाने आज पुकोव्हस्कीला तसं करता आलं नाही. “, असं पॉन्टींग म्हणाला.