Rishabh Pant Statement on Rishabh Pant: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या कसोटीला सिडनीमध्ये सुरुवात झाली आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या सामन्यात खेळत आहे. कारण रोहित शर्माने या कसोटीत विश्रांती घेण्याचा निर्णय घेतल्याने तो सिडनी कसोटीत प्लेईंग इलेव्हनच्या निवडीसाठी उपलब्ध नव्हता. आता रोहितला वगळल्याबाबत ऋषभ पंतचे विधान समोर आले आहे. रोहित शर्माचा हा निर्णय भावुक असल्याचे ऋषभ पंत म्हणाला आहे.
सिडनी कसोटीत नाणेफेकीच्या वेळीस जसप्रीत बुमराहने प्लेईंग इलेव्हनबाबत सांगताना रोहित शर्माबाबत सांगितले. तेव्हा बुमराह म्हणाला, संघाचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात विश्रांती घेण्याचा निर्णय घेत नेतृत्त्वाचं एक उत्तम उदाहरण दिलं आहे. यावरून संघातील एकजूट दिसून येते. जे संघाच्या हिताचं असेल तोच निर्णय घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.
कर्णधार रोहित शर्माच्या संघाबाहेर होण्याच्या निर्णयाबाबत बोलताना ऋषभ पंत म्हणाला, “हा एक भावुक करणारा निर्णय आहे, यात शंकाच नाही. कारण तो गेल्या बऱ्याच काळापासून संघाचा कर्णधार आहे. आम्ही त्याच्याकडे संघाचे नेतृत्त्व करणारा एक नेता म्हणून पाहत आलो आहेत. पण असे काही निर्णय असतात ज्यामध्ये आमचा सहभाग नसतो आणि हा मॅनेजमेंटचा निर्णय आहे. मी त्या चर्चेचा भाग नव्हतो, त्यामुळे याबाबत जास्त काही सांगू शकणार नाही.”
रोहित शर्माच्या फॉर्मवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. आणि तेच त्याला संघातून वगळण्याचे कारण ठरले ृ. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सध्याच्या कसोटी मालिकेत रोहित शर्माने ५ डाव खेळले, ज्यात त्याने ६.२० च्या सरासरीने केवळ ३१ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो सर्वात कमी फलंदाजीची सरासरी असलेला कर्णधार बनला आहे.
रोहित शर्माला वगळल्यानंतरही भारताची फलंदाजी बाजू पूर्णपणे ढासळली. सिडनी कसोटीत भारतीय संघ नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत १८५ धावांवर पहिल्याच दिवशी सर्वबाद झाला. ऋषभ पंतने उत्कृष्ट फलंदाजी करत ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर जसप्रीत बुमराहनेही २२ धावांची खेळी करत भारताच्या धावांमध्ये भर घातली. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावात दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर उस्मान ख्वाजाला बाद करत १ विकेट घेतली.