Rishabh Pant stump out against Nathan Lyon video viral : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना ऑप्टस क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यातील भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात अनुभवी ऑफस्पिनर नॅथन लायनने ऋषभ पंतला बाद केले. लायनने अतिशय हुशारीने पंतला बाद केले. पंत अवघी एक धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या स्फोटक खेळाडूला लायनने ज्याप्रकारे आपल्या जाळ्यात अडकवले, त्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
ऋषभ पंत लायनच्या जाळ्यात कसा अडकला?
वास्तविक, भारतीय संघाच्या दुसऱ्या डावातील ९६ वे षटक अनुभवी ऑफस्पिनर नॅथन लायन टाकत होता. त्यावेळी ऋषभ पंत त्याच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर स्ट्राइकवर होता. लायनने चेंडू टाकल्यानंतर ऋषभ पुढे सरसावत मोठा फटक खेळण्यासाठी गेला, पण पंत क्रीजबाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न करणार याची कल्पना लायनला आधीच होती, म्हणून त्याने चेंडू थोडा बाहेर टाकला आणि ऋषभ पंत चेंडूपर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घेतली.
यानंतर चेंडू खेळपट्टीवर पडताच क्षणी आणखी बाहेर वळला. चेंडू बाहेर गेल्याने ऋषभ पंत तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. तसेच तो क्रीजपासून खूप दूर आला होता, ज्यामुळे तो स्टंप आऊट झाला होता. विशेष म्हणजे पंत त्याच्या कसोटी कारकिर्दीत फक्त दुसऱ्यांदा स्टंप आऊट झाला आहे. यापूर्वी २०२१ मध्ये त्याला जेक लीचने अशा प्रकारे बाद केले होते. ऋषभ पंतने नॅथन लायनला खूप त्रास दिला आहे. या दिग्गज गोलंदाजाविरुद्ध तो अनेकदा आक्रमक शैलीत खेळतो, पण आज त्याचा प्रयत्न फसला.
भारतीय संघाचा दुसरा डाव –
तिसऱ्या दिवशी चहापानापर्यंत भारताने दुसऱ्या डावात पाच गडी गमावून ३५९ धावा केल्या होत्या. सध्या विराट कोहली ४० आणि वॉशिंग्टन सुंदर १४ धावांसह खेळत आहेत. दोघांमध्ये आतापर्यंत ३८ धावांची भागीदारी झाली आहे. भारताने आज बिनबाद १७२ धावांवरुन खेळण्यास सुरुवात केली होती. केएल राहुलच्या रूपाने टीम इंडियाला पहिला धक्का बसला. तो ७७ धावा करून बाद झाला. त्याने यशस्वी जैस्वालसोबत २०१ धावांची भागीदारी केली.
त्याचवेळी यशस्वीने कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले. यानंतर देवदत्त पडिक्कल दुसऱ्या विकेटच्या रुपाने बाद झाला. त्याने यशस्वीसोबत ७४ धावांची भागीदारी केली. पडिक्कलने २५ धावा केल्या. यशस्वी १६१ धावा करून बाद झाला. ३१३ धावा असताना भारताने दोन विकेट्स गमावल्या होत्या. ३२१ पर्यंत पोहोचताना टीम इंडियाने पाच विकेट्स गमावल्या. यशस्वीनंतर ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल प्रत्येकी एक धाव काढून बाद झाले.