Rishabh Pant Mother Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ नोव्हेंबरपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरू होत आहे. या मालिकेत दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना पर्थ स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडू वेगवेगळ्या बॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला जाणार असून, त्याचीही सुरुवात झाली आहे. केएल राहुल आणि ध्रुव जुरेल आधीच ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. आता टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. त्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या आईबरोबर दिसत आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऋषभ पंत बुधवारी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. यावेळी तो त्याच्या आईबरोबर विमानतळावर पोहोचला होता. ज्याचा व्हिडिओही समोर आला आहे. बुधवारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी ऋषभ पंतने कारमधून उतरल्यावर आईचे आशीर्वाद घेतले आणि मग तो पुढे निघाला. ऋषभ पंतचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, कार अपघातानंतर ऋषभ पंतचा हा पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा आहे.

हेही वाचा – IPL Auction 2025: आयपीएल लिलावात दिसणार ४२ वर्षीय खेळाडू, १५ वर्षांपूर्वी खेळला होता अखेरचा टी-२० सामना; ‘या’ संघाचा आहे गोलंदाजी कोच

ऋषभ पंतची अलीकडची कामगिरी पाहता तो भारतासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू असणार आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. पंतने सहा डावात ४३.५० च्या सरासरीने २६१ धावा केल्या. ज्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश होता, त्यादरम्यान त्याने ९९ धावांची खेळीही खेळली.

हेही वाचा – Virat Kohli Birthday: विराट, वामिका, अकाय…; अनुष्का शर्माने पहिल्यांदाच शेअर केला दोन्ही मुलांबरोबरचा फोटो, कोहलीच्या वाढदिवशी खास पोस्ट

किवी संघापूर्वी बांगलादेशविरुद्ध शतक झळकावून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. त्या मालिकेतील २ सामन्यांत त्याने ५३.६६ च्या सरासरीने १६१ धावा केल्या. त्याचबरोबर मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ऋषभ पंत टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला होता. त्याने गब्बा येथे शानदार खेळी खेळली आणि संघाला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला.

हेही वाचा – Ranji Trophy: केरळच्या जलाज सक्सेनाने रणजी ट्रॉफीत घडवला इतिहास, आजवर कोणालाच नाही जमलं ते करून दाखवलं

भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर ही मालिका कोणत्याही किंमतीवर जिंकावी लागेल. न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिका पराभवामुळे, भारताची जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता धुसर झाली आहे, कारण गुणांची टक्केवारी घसरली आहे. संघाची टक्केवारी ५८.३३% पर्यंत घसरली, ज्यामुळे ते जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहेत. आता टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाला किमान ४ सामन्यांमध्ये पराभूत करावे लागेल.