शिखर धवनच्या दुखापतीमुळे भारतीय संघात जागा मिळालेला ऋषभ पंत, अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात विश्वचषक स्पर्धेत पदार्पण करण्याची शक्यता आहे. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला विजय शंकर सरावसत्रादरम्यान जायबंदी झाला होता. जसप्रीत बुमराहचा यॉर्कर चेंडू विजय शंकरच्या पायाला लागला होता. विजय शंकरची ही दुखापत फारशी गंभीर नसली तरीही खबदरीचा उपाय म्हणून ऋषभ पंतला अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात संधी देण्यात येऊ शकते का याबाबत चाचपणी सुरु झाली आहे.
हिंदुस्था टाईम्स वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, नेट्समध्ये सरावादरम्यान ऋषभ पंत चांगल्या फॉर्मात दिसत होता. त्याने सरावादरम्यान काही खेळलेले फटके सर्वांची वाहवा मिळवून गेले. विजय शंकरची दुखापत फारशी गंभीर नसली तरीही नंतर झालेल्या सरावसत्रात तो सहभागी होऊ शकला नाही. त्यामुळे खबदराची उपाय म्हणून ऋषभ पंतला भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत झालेल्या सामन्यात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडविरुद्ध सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात ऋषभला संघात जागा मिळते का आणि भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.