ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघ यावर्षी अंतिम फेरीत पोहोचण्यास अपयशी ठरला. पहिल्या क्वालिफायर फेरीत चेन्नईने पराभूत केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात कोलकात्याने अंतिम फेरीची वाट अडवली. त्यामुळे दिल्लीचं आयपीएल जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. असं असताना दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत सोशल मीडियावर दिलेल्या शुभेच्छांमुळे ट्रोल झाला आहे. ऋषभने ट्वीट करत महानवमीऐवजी रामनवमीच्या शुभेच्छा दिल्याने ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.
“मला आशा आहे की, ही राम नवमी आपल्या सर्वांना आरोग्य, समृद्धी आणि शांती घेऊन येवो. आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवा आणि सुरक्षित राहा”, असं ट्वीट ऋषभ पंतने केलं आहे.
ऋषभ पंतच्या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी त्यावर मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत. तसेच काही जणांनी मीम्स शेअर करत खिल्ली उडवली आहे.
कोलकात्याकडून मिळालेल्या पराभवानंतर दिल्लीच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर दु:ख स्पष्ट दिसत होतं. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने पराभवानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. “सामन्यानंतर काहीही बदलू शकत नाही. आम्ही शक्य तितक्या वेळ जिंकण्यावर विश्वात ठेवत खेळत राहीलो. गोलंदाजांनी ते करून दाखवलं. मधल्या टप्प्यात त्यांनी खरंच चांगली गोलंदाजी केली. आम्ही स्ट्राइक फिरवू शकलो नाही. आम्ही पुढच्या हंगामासाठी जोरदार तयारी करू. आम्ही संपूर्ण हंगामात चांगलं खेळलो. आम्ही एकत्र राहिलो. आशा आहे की, पुढच्या वर्षी आम्ही चुका दुरुस्त करून पुन्हा एकदा परत येऊ”, अशा भावना दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने व्यक्त केल्या होत्या.