K. Shrikant on Rishabh Pant: एकदिवसीय विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मात्र, यासाठी टीम इंडियाची घोषणा अद्याप झालेली नाही. दुखापतीमुळे भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत या विश्वचषकाचा भाग होऊ शकणार नाही. रस्ता अपघातानंतर झालेल्या दुखापतीतून तो सावरत आहे आणि विश्वचषकापर्यंत त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होणे शक्य दिसत नाही. आता टीम इंडियाचे माजी मुख्य निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत यांनी पंतबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
“यष्टिरक्षक ऋषभ पंत जर तंदुरुस्त असता तर भारत विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार ठरला असता”, असे टीम इंडियाचा माजी खेळाडू के श्रीकांतने म्हटले आहे. माजी सलामीवीर फलंदाज के. श्रीकांत पुढे म्हणाले की, “आम्हाला ऋषभ पंतच्या स्थितीबद्दल जास्त माहिती नाही, मी लगेच म्हणू शकलो असतो की तो टीम इंडियाचा आवडता आणि मुख्य खेळाडू असेल.”
पंतच्या अनुपस्थितीमुळे संघातील कॉम्बिनेशन बिघडलं आहे
कृष्णमाचारी श्रीकांतन यांनी आपल्या आताच्या विधानात म्हटले आहे की, “पंतच्या अनुपस्थितीत संघात एक अंतर निर्माण झाले असून संपूर्ण संरचना बदलली आहे. पंत याच्याबाबतची खरी परिस्थिती सध्या आम्हाला माहीत नाही. तो विश्वचषकात खेळला असता तर मी स्पष्टपणे सांगितले असते की भारताला विश्वचषक जिंकवून देण्याचा खरा दावेदार आहे, परंतु पंतच्या फिटनेसवर सध्या शंका आहे.”
ऋषभ पंत हा एक्स फॅक्टर ठरला असता
१९८३च्या विश्वविजेत्या संघाचा प्रमुख सदस्य आणि माजी सलामीवीर श्रीकांत पुढे म्हणाले की, ऋषभ पंत विश्वचषकात खेळणार की नाही हे कोणालाच माहीत नाही. मलाच नाही पण त्याच्या खेळाबाबत सर्वानांच साशंकता असून त्याने खेळावे ही त्याच्या क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे. जर ऋषभ पंत विश्वचषक खेळला असत तर तो ‘एक्स’फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरला असता यात कोणालाच शंका नाही. तो जर असता तर टीम इंडिया चॅम्पियन झाली असती.”
संघ निवडीबाबत श्रीकांत म्हणाले की, “निवडकर्त्यांना युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण असलेला संघ बनवावा लागेल. जर इशान किशनला संघात स्थान मिळाले तर तो दुसऱ्या संघासाठी धोकादायक खेळाडू ठरू शकतो. मला वाटते की इशान हा चांगला यष्टीरक्षक असून उत्तम फलंदाजी देखील करतो.
के.एल. राहुलकडून पुनरागमनचे संकेत
संघाबाहेर असलेल्या के.एल. राहुलला मधल्या फळीत परत आणण्याची गरज असल्याचे श्रीकांत यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, “लोकेशचे आगमन ही टीम इंडियासाठी खूप चांगली गोष्ट असेल. तुमच्याकडे रोहित, शुबमन गिल आणि नंतर कोहली आहे. विराट या फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करत असून त्याच्या उपस्थितीमुळे भारताला विश्वचषकात मोठी मदत होईल.”
बीसीसीआय पंतऐवजी ‘या’ खेळाडूंना आजमावत आहे
गेल्या वर्षी २०२२ मध्ये तो रस्ता अपघाताचा बळी ठरला होता. तेव्हापासून तो दुखापतीतून सावरल्यानंतर तंदुरुस्त होण्याचा प्रयत्न करत आहे. पंत बाहेर पडल्यापासून रोहित यष्टिरक्षकासाठी वेगवेगळे पर्याय वापरून पाहत आहे. यादरम्यान व्यवस्थापनाने इशान किशन, के.एल. राहुल, संजू सॅमसन आणि के.एस. भरत यांचा वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये वापर केला आहे.