केपटाऊनमध्ये भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने (IND vs SA) दमदार फलंदाजीचा नजराणा पेश करत दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या दुसऱ्या डावात शतक ठोकले. भारतीय संघ अडचणीत सापडला असताना पंत धावून आला आणि त्याने नाबाद १०० धावा ठोकल्या. त्याच्या कामगिरीमुळे आफ्रिकेला दुसऱ्या डावात २१२ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. पंतच्या या खेळीनंतर भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कप्तान रोहित शर्माने कोड्यात टाकणारे ट्वीट केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतने शतक ठोकताच रोहितने इमोजी असलेले ट्वीट पोस्ट केले. या ट्विटवरून पंतने टीकाकारांची तोंडे बंद केली, असा अर्थ लावला जात आहे. आफ्रिका दौऱ्यावर ऋषभ पंत अपयशी ठरत होता. पहिल्या दोन कसोटीत त्याच्या बॅटमधून जास्त धावा निघाल्या नाहीत. कसोटीमधील त्याच्या फलंदाजीच्या तंत्राबद्दलही शंका उपस्थित करण्यात येत होत्या.

आता त्याने झुंजार आणि आपला नैसर्गिक खेळ दाखवत सर्वांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. याच अनुषंगाने रोहितने त्याचे कौतुक करत ट्वीट केले. पंतने ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद १०० धावांची खेळी केली. मधल्या फळीत त्याने विराटसोबत ९२ धावांची मौल्यवान भागीदारी रचली.

हेही वाचा – IPL 2022 : इंग्लंडचा जो रूट लीगमध्ये खेळणार? मेगा ऑक्शनमध्ये उतरणार असल्याचे दिले संकेत!

रोहित शर्मा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेतून (IND vs SA) बाहेर पडला आहे. तो आणि अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांनी दुखापतीतून सावरण्यासाठी एनसीएसमध्ये तयारी सुरू केली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघाची घोषणा करताना रोहित शर्माला भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार बनवण्यात आले. मात्र, सराव करताना रोहितला दुखापत झाली आणि कसोटी मालिकेतून तो बाहेर पडला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pants century and rohit sharmas tweets goes viral on twitter adn