भारतीय संघात ऋषभ पंतची खराब कामगिरी हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या काही मालिकांमध्ये फलंदाजीत ऋषभचं सतत अपयशी होणं, यामुळे भारतीय संघात पुन्हा एकदा नवीन खेळाडूला संधी द्यावी का अशी चर्चा सुरु झाली आहे. कित्येकांनी सोशल मीडियावर धोनीला भारतीय संघात स्थान देण्याचीही मागणी केली. बांगलादेशविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यातही ऋषभ केवळ ६ धावा करु शकला. अशा परिस्थितीतही भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकरांनी पंतची पाठराखण केली आहे.
“क्रिकेटमध्ये दोन-तीन गोष्टी काहीशा निःस्वार्थ भावनेसारख्या असतात. एक काम तर पंचांचं असतं, जर त्यांनी ९ निर्णय योग्य दिले आणि एक निर्णय चुकीचा दिला तर त्यांच्या एका चुकीच्या निर्णयाची चर्चा होते. ९ चांगल्या निर्णयांबद्दल कोणीही बोलत नाही. असंच यष्टीरक्षकांबद्दल आहे, ९५ टक्के चांगलं काम केल्यानंतरही त्यांच्या एका चुकीबद्दल त्यांना बोल लावले जातात. ऋषभबद्दल सध्या हेच घडत आहे. तो यष्टीरक्षणात चांगली कामगिरी करतानाही त्याच्या चुकीबद्दल अधिक बोललं जात आहे”, पत्रकारांशी संवाद साधताना गावसकर बोलत होते.
एकीकडे ऋषभ पंत फलंदाजीत खराब कामगिरी करत असताना, श्रेयस अय्यरने अखेरच्या टी-२० सामन्यात धडाकेबाज खेळी केली. यानंतर पत्रकारांशी बोलत असताना अय्यरने संघ व्यवस्थापनाने चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी मला पाठींबा दिल्याचं जाहीर केलं. त्यामुळे आगामी काळात ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या दोन्ही फलंदांजांच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
अवश्य वाचा – चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सुटला, पंतचा पत्ता कट ! मुंबईकर श्रेयस अय्यरला पसंती