ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर सप्टेंबरमध्ये भारतात परतले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिनेता इरफान खानच्या निधनाला २४ तासदेखील पूर्ण होत नाहीत, तर कलाविश्वावर हा दुसरा आघात झाला. त्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. क्रिकेट विश्वातूनही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे, माजी फलंदाज मोहम्मद कैफ आदी क्रिकेटपटूंनी ऋषी कपूर यांना ट्विटच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.

ऋषी कपूर यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ रोजी दक्षिण मुंबईत झाला. ‘चिंटू’ या टोपण नावानेही ते ओळखले जात. बॉलिवूडचे शोमॅन दिग्दर्शक आणि अभिनेते राज कपूर यांचे ते दुसरे पुत्र. ज्येष्ठ बंधू रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांच्यासोबत त्यांनी मुंबईतील कॅम्पेन स्कूल कॉन्व्हेंट स्कूलमधून शिक्षण घेतलं. ऋषी कपूर यांनी जवळपास ९२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘मेरा नाम जोकर’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर ते पहिल्यांदा डिंपल कपाडियासोबत बॉबी (१९७३) या सिनेमात प्रमुख भुमिकेत झळकले. त्या काळात तरुणांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला होता. त्यामुळे पहिल्याच सिनेमानंतर ऋषी कपूर बॉलिवूडमध्ये ओळखले जाऊ लागले.

त्यानंतर नीतू सिंग आणि ऋषी कपूर या जोडीने १९७४ ते १९८१ या काळात अनेक चित्रपट केले. ऋषी कपूर यांनी १९७४ ते १९९७ या काळात ५१ मुख्य भुमिका केल्या. यापैकी ४० सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. तर केवळ ११ सिनेमे हिट ठरले. बॉबी, लैला मजनू, रफू चक्कर, सरगम, कर्ज, प्रेम रोग, नगिना, हनिमून, बंजारण, हीना आणि बोल राधा बोल या चित्रपटांचा समावेश होता.

नुकतेच कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन ऋषी कपूर भारतात परतले होते. ११ महिने ११ दिवस न्यूयॉर्कमध्ये उपचार घेऊन ते भारतात परतले होते. परदेशी उपचार सुरू असताना त्यांनी अनेकदा मायदेशी येण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती. पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकण्याची त्यांची खूप इच्छा होती. पण त्यांची ती इच्छा अपूर्ण राहिली.