भारतीय हॉकी संघाने गेल्या काही महिन्यात केलेली प्रगती लक्षणीय आहे मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर अव्वल दर्जाचे यश मिळविण्यासाठी त्यांनी नियोजनबद्ध व शिस्तबद्ध खेळ केला पाहिजे असे ऑस्ट्रेलियाचे ज्येष्ठ हॉकीपटू रिक चार्ल्सवर्थ यांनी सांगितले.
ऑलिम्पिकमधील लाजिरवाण्या कामगिरीनंतर भारताने जागतिक चॅम्पियन्स चषक स्पर्धेत चौथे स्थान मिळविले होते तर आशियाई चॅम्पियन्स चषक स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले होते. भारताच्या या कामगिरीबद्दल प्रशंसा करीत चार्ल्सवर्थ म्हणाले, लंडन ऑलिम्पिकच्या तुलनेत या खेळाडूंनी स्पृहणीय यश मिळविले आहे. जगज्जेतेपद मिळविण्यासाठी मात्र शिस्तबद्ध सराव करण्याची आवश्यकता आहे. या खेळाडूंकडे अव्वल दर्जाचे यश मिळविण्याची क्षमता आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर नियमावलीत जे बदल झाले आहेत व तंत्रही बदलले आहे. हा बदल आत्मसात करण्याचा प्रयत्न भारतीय खेळाडूंनी केला पाहिजे.
भारतीय खेळाडूंनी खूप परिश्रम केले पाहिजेत. पुरुष व महिला खेळाडूंनी प्रत्येक स्तरावरील स्पर्धामधील कामगिरीचे बारकाईने आत्मपरीक्षण केले पाहिजे. तसेच अन्य सहकाऱ्यांकडूनही शिकण्याची वृत्ती त्यांनी ठेवली पाहिजे असेही चार्ल्सवर्थ यांनी सांगितले.