मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या नव्या हंगामाला सुरुवात होईल तेव्हा नोव्हाक जोकोविचच्या विक्रमी कामगिरीचे आकर्षण राहणार असले, तरी खरी स्पर्धा कार्लोस अल्कराझ आणि यानिक सिन्नेर यांच्यातच रंगेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अल्कराझनेदेखील सिन्नेरचे आव्हान मान्य केले आहे. ‘‘जेव्हा जेव्हा मी सिन्नेरला अव्वल स्थानावर बघतो, तेव्हा मला आणखी कठोर सराव करण्याची जाणीव होते. त्यामुळेच सराव करताना सिन्नेरविरुद्ध खेळण्यासाठी कशा सुधारणा कराव्या लागतील याचाच विचार सुरू असतो,’’ असे अल्कराझ म्हणाला.

‘‘कठोर सराव करायला भाग पडणे ही भावनाच मला मोठी आणि महत्त्वाची वाटते. टेनिसपटूंमध्ये इतकी मोठी स्पर्धा असणे आणि त्यासाठी सर्वोत्तम खेळ करण्यासाठी विचार करावा लागणे यामुळे मेहनतीपासूनच कस लागतो,’’ असेही अल्कराझने सांगितले.

हेही वाचा >>> Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन

अल्कराझ आणि सिन्नेर ही नावे सध्या टेनिसविश्वात आघाडीवर आहेत. रॉजर फेडररपाठोपाठ राफेल नदालने माघार घेतल्यामुळे आता टेनिसविश्वात इतिहास घडविणाऱ्या तीन सर्वोत्तम टेनिसपटूंपैकी नोव्हाक जोकोविचचेच आव्हान या दोघांसमोर असेल. यातही जोकोविचचा सिन्नेरच्या गटात समावेश असल्यामुळे प्रवास अखंडित राहिल्यास दोघांची उपांत्य फेरीत गाठ पडू शकते.

टेनिस विश्वावर नजर टाकल्यास केवळ नावेच बदलली आहेत. खेळातील गतिमानता आणि चुरस तेवढीच तीव्र राहिली असल्याचेच दिसून येते. सिन्नेर आणि अल्कराझ यांचे महत्त्व सांगताना अॅलेक्झांडर झ्वेरेव म्हणाला,‘‘दोघेही सर्वोत्तम खेळाडू आहेत. तुम्हाला जिंकायचे असेल, तर यांना पराभूत करावे लागेल.’’ झ्वेरेवला स्पर्धेत दुसरे मानांकन आहे. सिन्नेरला पहिले, तर अल्कराझला तिसरे मानांकन मिळाले आहे. सिन्नेर गतविजेता आहे, तर अल्कराझने विम्बल्डन स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. याखेरीज दोघांनी गेल्या वर्षी अनुक्रमे अमेरिकन आणि फ्रेंच खुली स्पर्धाही जिंकली आहे. अल्कराझने या दोन्ही विजेतेपदाच्या प्रवासात झ्वेरेववर मात केली आहे.

महिला विभागात अग्रमानांकित अरिना सबालेन्का, ऑलिम्पिक विजेती झेंग किन्वेन यांच्या पहिल्या दिवशी, तर इगा श्वीऑटेक, कोको गॉफ दुसऱ्या दिवशी कोर्टवर उतरतील.

● वेळ : पहाटे ५.३० वा.

● थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन २, टेन ५

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rising tennis stars sinner and alcaraz gear up for australian open 2025 zws