मेलबर्न : पाठीची दुखापत असतानाही जसप्रीत बुमराला ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळवण्याचा धोका पत्करणे भारतासाठी जोखमीचे ठरले असते. विश्वचषक महत्त्वाचा असला, तरी बुमराची कारकीर्द जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे त्याच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची निवड केल्याचे भारताचा कर्णधार रोहित शर्माने शनिवारी सांगितले.
‘‘शमीला दोन-तीन आठवडय़ांपूर्वी करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) खूप मेहनत घेतली. आता तो ब्रिस्बनमध्ये दाखल झाला आहे. तो रविवारी आमच्यासोबत सराव करेल. त्याच्या तंदुरुस्तीबाबत आम्हाला मिळालेली माहिती ही सकारात्मक आहे. त्याने तीन-चार सत्रांत कोणत्याही अडथळय़ांविना गोलंदाजी केली,’’ असे रोहित म्हणाला. ‘‘बुमराची गुणवत्ता सर्वानाच ठाऊक आहे. बुमराच्या पाठदुखीबाबत आम्ही अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली. मात्र, आम्हाला सकारात्मक उत्तर मिळाले नाही,’’ असे रोहितने नमूद केले.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज!
जायबंदी खेळाडूंचा विचार करण्यापेक्षा संघात असलेल्या खेळाडूंवर विश्वास दाखवण्याचा आणि त्यांना योग्यपणे वापरण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे रोहितने सांगितले. ‘‘परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आम्ही ऑस्ट्रेलियात लवकर दाखल झालो. आम्ही दोन सराव सामने खेळलो आणि दोन सामने खेळणार आहोत. आम्ही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज असू. त्या सामन्यासाठी ११ खेळाडू कोण असणार हे आम्हाला ठाऊक आहे,’’ असे रोहित म्हणाला.