भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार रितू राणी हिला ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत निवडलेल्या संघात स्थान न दिल्यामुळे तिने आंतरराष्ट्रीय हॉकी क्षेत्रातून निवृत्ती घेतली आहे.
रितू ही उद्धट वर्तन करते, या कारणास्तव रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघात तिला स्थान देण्यात आले नव्हते. मात्र भारताच्या राष्ट्रीय शिबिरासाठी नुकतीच निवड केलेल्या २९ संभाव्य खेळाडूंमध्ये तिला स्थान देण्यात आले होते. या शिबिरास भोपाळ येथे रविवारी प्रारंभ झाला. ऑलिम्पिकसाठी निवडलेल्या संघात आपल्याला स्थान मिळाले नाही याचे दु:ख तिला सलत होते. त्यामुळेच तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक हॉकीतून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत.
हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंदर बात्रा यांनी सांगितले, आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्त होत असल्यामुळे आपण या शिबिरास सहभागी होऊ शकत नाही, असा संदेश तिने दोन-तीन दिवसांपूर्वीच आम्हाला पाठविला आहे. हा निर्णय तिचा वैयक्तिक स्वरूपाचा असून, आम्ही तिच्या निर्णयाचे स्वागत करतो. तिने आंतरराष्ट्रीय हॉकी क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल आम्हाला खूप आदर वाटतो. भारतीय संघाने रितूच्या नेतृत्वाखाली ऑलिम्पिकमध्ये तब्बल ३६ वर्षांनंतर पात्रता पूर्ण केली होती. तिच्याच नेतृत्वाखाली भारताने २०१४ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक, तर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. भारतीय संघातून वगळल्यानंतर तिने नुकताच पतियाळा येथील पंजाबी गायक हर्ष शर्मा याच्याशी विवाह केला.