Three players debut in Indian T20 team : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या तीन खेळाडूंना या सामन्यातून टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली. या तिन्ही खेळाडूंनी आयपीएल २०२४ मध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे बीसीसीआयने या मालिकेसाठी या तीन खेळाडूंची निवड केली होती.
रियान परागने पदार्पण करताच इतिहास रचला –
या तिन्ही खेळाडूंची इतर अनेक भारतीयाप्रमाणे टीम इंडियासाठी खेळण्याचे स्वप्न होते, जे आज सत्यात उतरले आहे. आयपीएलमध्ये अभिषेक शर्मा सनरायझर्स हैदराबादकडून, तर ध्रुव जुरेल आणि रियान पराग राजस्थान रॉयल्सकडून खेळतात. या तिन्ही खेळाडूंना भारतीय संघात टी-२० मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. गिलच्या नेतृत्वात झिम्बाब्वे दौऱ्यात या तिघांचं भारतासाठी खेळायचं स्वप्न साकार झाले. या दरम्यान रियान परागने पदार्पण करताच इतिहास रचला आहे. भारतासाठी पदार्पण करणारा रियान आसामचा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. काही दिवसांपूर्वी महिला संघात आसामच्या उमा छेत्रीने भारतासाठी पदार्पण केलं होतं. ईशान्य भारतासाठी हा खूप मोठा क्षण आहे.
अभिषेक शर्माकडून खूप अपेक्षा –
टीम इंडियाचा माजी टी-२० कर्णधार रोहित शर्माने टी-२० वर्ल्ड कप संपल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहित शर्मा कर्णधार तसेच टीम इंडियाचा सलामीवीर होता. ज्यांनी विश्वचषकादरम्यान भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अशा स्थितीत विश्वविजेत्या संघाला टी-२० फॉरमॅटमध्ये मजबूत सलामीवीराची गरज आहे. त्यामुळे चाहत्यांना अभिषेक शर्माकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात अभिषेक शर्माने अनेक दमदार खेळी खेळल्या. सनरायझर्स हैदराबादला अंतिम फेरीत नेण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. अशा परिस्थितीत अभिषेक शर्माला सलामीवीर म्हणून स्वत:ला सिद्ध करायचे आहे.
हेही वाचा – Euro Cup: यजमान जर्मनीला धूळ चारत स्पेन उपांत्य फेरीत दाखल
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत : शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद.
झिम्बाब्वे: तदिवनाशे मारुमणी, इनोसंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह माडेंडे (विकेटकीपर), वेस्ली माधवेरे, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.