Riyan Parag seven consecutive fifties Syed Mushtaq Ali trophy: आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा आसामचा युवा क्रिकेटर रियान पराग सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. या स्पर्धेत आसाम संघाचे नेतृत्व करताना परागने अप्रतिम कामगिरी करत आपल्या संघाला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवले. मागील सामन्यातच रियान परागने सलग सहा अर्धशतके झळकावून विश्वविक्रम केला होता. आता त्याने सलग सातव्या सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. या स्पर्धेत त्याने ११ विकेट्सही घेतल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत त्याने अष्टपैलू म्हणून स्वत:ला सिद्ध केले असून टीम इंडियाचे दरवाजेही ठोठावले आहेत.
संघाला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवले –
रियान परागने या स्पर्धेतील आठव्या सामन्यात सातवे अर्धशतक ठोकले आहे. पहिल्या सामन्यात त्याला ४५ धावाच करता आल्या होत्या. त्यानंतर प्रत्येक सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले आहे. रियान परागच्या नेतृत्वाखाली आसामने मंगळवारी बंगालविरुद्ध शानदार विजय मिळवला. त्याच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर आसामने बंगालचा ८ गडी राखून पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. या सामन्यात ५० धावांच्या नाबाद खेळीसोबतच रियानने ४ षटकात २३ धावा देत २ विकेट्सही घेतल्या. रियान पराग व्यतिरिक्त, जगातील कोणालाही टी-२० क्रिकेटमध्ये सलग ६ अर्धशतकं झळकावता आलेली नाहीत. त्याने सात अर्धशतकं झळकावत विश्वविक्रम केला आहे. रियान परागच्या आधी हा विक्रम वीरेंद्र सेहवाग, इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर, पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कामरान अकमल आणि झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि सलामीवीर हॅमिल्टन मसाकादझा यांसारख्या दिग्गजांच्या नावावर होता.
सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतील रियान परागची कामगिरी –
नाबाद ५० विरुद्ध बंगाल (उपांत्यपूर्व फेरी)
नाबाद ५७ विरुद्ध केरळ
७२ विरुद्ध हिमाचल प्रदेश
७६ विरुद्ध चंदीगड
५३ नाबाद विरुद्ध सिक्कीम
७६ नाबाद विरुद्ध सेवा
६१ विरुद्ध बिहार
४५ विरुद्ध ओडिशा
रियान परागचे अष्टपैलू प्रदर्शन –
रियान परागने या स्पर्धेतील आठ सामन्यांमध्ये बॉल आणि बॅट दोन्हीसह आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. फलंदाजीच्या जोरावर त्याने आठ डावांत सात अर्धशतकांसह ४९० धावा केल्या. त्याचबरोबर गोलंदाजीतही शानदार प्रदर्शन करताना ११ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा अप्रतिम फॉर्म म्हणजे त्याने आपल्या कामगिरीने टीम इंडियाचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केल्याचे द्योतक आहे. यापूर्वी त्याने विजय हजारे ट्रॉफी, देवधर ट्रॉफी आणि इमर्जिंग आशिया कपमध्येही चमकदार कामगिरी केली आहे.