Riyan Parag breaks Yusuf Pathan’s record of sixes: आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करणारा रियान पराग देवधर ट्रॉफी २०२३ मध्ये पूर्व विभागाकडून खेळत आहे. या स्पर्धेतील सातव्या सामन्यात त्याने उत्तर विभागाविरुद्ध मैदानावर १३१ धावांची अप्रतिम खेळी केली. या खेळीच्या जोरावर त्याने युसूफ पठाणचा मोठा विक्रम मोडला.
एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम प्रस्थापित केला –
रियान परागने उत्तर विभागाविरुद्ध १३१ धावांची खेळी साकारताना ११ गगनचुंबी षटकार लगावले. त्यामुळे परागने युसूफ पठाणचा पश्चिम विभागाकडून उत्तर विभागाविरुद्ध (२०१०) नऊ षटकारांचा विक्रम मोडला आहे. त्याचबरोबर स्पर्धेच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम प्रस्थापित केला. या पराक्रमात परागने उत्तरेकडील वेगवान गोलंदाज संदीप शर्माच्या गोलंदाजीवर तीन षटकार ठोकले.
रियान परागची खेळी महत्त्वाची होती. कारण पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याच्या संघाने ५७ धावांत ५ विकेट गमावल्या होत्या, मात्र रियानच्या खेळीमुळे त्याच्या संघाने ५० षटकात ८ विकेट गमावत ३३७ धावा केल्या. रियान व्यतिरिक्त, कुमार कुशाग्रानेही पहिल्या डावात पूर्व विभागासाठी चांगली खेळी खेळली आणि ९८ धावा केल्या, मात्र त्याचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले.
हेही वाचा – Bhuvneshwar Kumar: टीम इंडियाच्या गोलंदाजाने घेतला मोठा! इन्स्टाग्राम बायोमधून हटवला ‘तो’ शब्द
रियान परागने ११ षटकार आणि ५ चौकारांचा पाडला पाऊस –
रियान परागने सहाव्या क्रमांकावर येऊन संघाला चांगल्या पद्धतीने सावरले. अत्यंत दबावाच्या परिस्थितीतही त्याने संयमाने फलंदाजी केली आणि ८४ चेंडूत ८ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने चौथे शतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने १०२ चेंडूंचा सामना करत १३१ धावा केल्या. या सामन्यात रियानला कुशाग्राची पूर्ण साथ लाभली आणि दोघांनी मिळून सहाव्या विकेटसाठी २३५ धावांची भक्कम भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत आणले.
हेही वाचा – जपान खुली बॅडमिंटन स्पर्धा : प्रणॉय, लक्ष्य उपांत्यपूर्व फेरीत
कुमार कुशाग्रनेही चांगली खेळी खेळली. त्याने ८७ चेंडूत ४ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ९८ धावा केल्या, पण तो त्याच्या शतकापासून दोन धावा दूर राहिला. रियान पराग बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या २९३ धावांवर पोहोचली होती. अखेरच्या क्षणी शाहबाज अहमदने नाबाद १६ धावा आणि मणिशंकर मुरासिंगने २५ धावांची जलद खेळी करत संघाची धावसंख्या ३३७ धावांपर्यंत पोहोचवली. उत्तर विभागाकडून मयंक यादव सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला ज्याने ४ तर हर्षित राणाने ३ विकेट्स घेतल्या.