काल (२४ मे) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेतील पहिला ‘क्वालिफायर’ सामना खेळवण्यात आला. कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघादरम्यान झालेल्या सामन्यात गुजरातने विजय मिळवला आहे. आपल्या पहिल्याच आयपीएल हंगामामध्ये धडाकेबाज कामगिरी करत गुजरातने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. तर पराभव झाल्यामुळे राजस्थानला अंतिम सामन्यात जाण्यासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे. काल झालेल्या क्वालिफायर सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्स संघातील युवा खेळाडू रियान पराग आपल्या वर्तणुकीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संघातील वरिष्ठ खेळाडू असलेल्या रविचंद्रन अश्विनवर त्यानं मैदानात आपला राग व्यक्त केला. शिवाय, क्षेत्ररक्षण करतानाही देवदत्त पडिक्कलवर रियान चिडताना दिसला. रियानच्या या वर्तणुकीमुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्याच्यावर टीका केली आहे.
आयपीएलच्या १५व्या हंगामामध्ये राजस्थान रॉयल्स संघातील रियान पराग आपल्या खेळापेक्षा वादग्रस्त वर्तणुकीमुळे जास्त गाजला. मंगळवारी गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यातील एका घटनेमुळं त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. राजस्थानच्या डावातील २०वे षटक सुरू असताना पाचवा चेंडू नो-बॉल पडला. त्यावेळी धाव घेण्याच्या नादात जोस बटलर धावबाद झाला. शेवटच्या चेंडूसाठी रविचंद्रन अश्विन मैदानात आला. त्यानंतर गुजरातच्या यश दयालने वाइड बॉल टाकला. अश्विनने धाव न घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, नॉन-स्ट्रायकरवर असलेला रियान पराग एकेरी धाव घेण्यासाठी पळाला आणि बाद झाला. बाद झाल्यानंतर रियान परागने रविचंद्रन अश्विनवर संताप व्यक्त केला.
राजस्थान रॉयल्सच्या क्षेत्ररक्षणादरम्यानही रियानने सहकारी खेळाडू देवदत्त पडिक्कलवर राग व्यक्त केला. १६व्या षटकात गुजरातच्या डेव्हिड मिलरने लाँग ऑनच्या दिशेने शॉट मारला. परागने झेप घेऊन चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला पण चेंडू त्याच्यापासून दूर गेला. त्यानंतर त्याने मिड-विकेटवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या देवदत्त पडिक्कलला ओरडण्यास सुरुवात केली.
रियान परागने सहकारी खेळाडूंना अशा प्रकारे वागणूक दिल्याने सोशल मीडियावर तो प्रचंड ट्रोल झाला आहे. परागची वागणूक योग्य नसल्याचं लोकाचं म्हणणं आहे. त्याने वरिष्ठ खेळाडूंचा आदर केला पाहिजे, असे सल्लेही त्याला मिळत आहेत. मात्र, मुंबई इंडियन्सचा खेळाडू सूर्यकुमार यादवनं ट्विट करत रियान परागचे कौतुक केले. यानंतर सूर्यकुमारलाही ट्रोल करण्यात आले.
आयपीएलच्या या हंगामामध्ये सुरुवातीपासूनच रियान वेळोवेळी मैदानात राग व्यक्त करताना दिसला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यामध्ये त्याची आणि हर्षल पटेलची कुरबूर झाली होती. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली होती.