नुकताच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा १५वा हंगाम पार पडला. २९ मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांदरम्यान रंगलेल्या सामन्याने या हंगामाचा शेवट झाला. अंतिम स्पर्धेत राजस्थान रॉयल्सला गुजरातकडून पराभव स्वीकारावा लागला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. असे असले तरी राजस्थानच्या अनेक खेळाडूंनी संपूर्ण हंगामात चांगला खेळ करत क्रिकेट रसिकांच्या मनावर आपली छाप सोडली. यामध्ये रियान परागचा समावेश होतो. २० वर्षीय रियान परागने क्षेत्ररक्षणात चमकदार कामगिरी केली. त्याने संपूर्ण हंगामात सर्वात जास्त (१७) झेल घेतले. आपल्या या कामगिरीशिवाय तो हर्षल पटेलशी झालेल्या वादामुळेही चर्चेत राहिला. या प्रकरणाबाबत रियान परागने पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रियान परागने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध केलेल्या अर्धशतकासह १४ डावांत १८३ धावा केल्या. बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात राजस्थानची फलंदाजीत कोसळली होती. संकटाच्या प्रसंगी रियानने ३१ चेंडूंत ५६ धावा करत झंझावाती अर्धशतक ठोकले होते. मात्र, डावातील अंतिम षटकानंतर बंगळुरूच्या खेळाडूंशी झालेल्या बाचाबाचीमुळे रियानच्या खेळीला गालबोट लागले.

त्यावेळी नेमके काय घडले होते, याबाबत रियान परागने खुलासा केला आहे. रियान म्हणाला, ”आयपीएलच्या १४व्या हंगामात हर्षल पटेलने मला बाद केले होते. त्यानंतर हातवारे करून त्याने मला मैदानाबाहेर जाण्यास सांगितले होते. तेव्हा ते माझ्या सहज लक्षातही आले नाही. मात्र, नंतर व्हिडिओ रिप्ले बघिल्यानंतर मला याची जाणीव झाली. ती गोष्ट माझ्या मनाला खटकली होती. आता या वर्षी मी अर्धशतक केल्यानंतर हर्षलकडे बघून त्याच पद्धतीने हाताचे इशारे केले. मी हर्षलला एक शब्दही बोललो नाही किंवा अपशब्दही वापरले नाही. तो देखील मला काहीच म्हणाला नव्हता.”

शेवटच्या षटकातील वाद चिघळण्यासाठी मोहम्मद सिराज जबाबदार असल्याचे रियान परागने म्हटले आहे. परागने पुढे सांगितले की, डाव संपल्यानंतर सिराजने मला हाक मारली आणि म्हणाला, ‘तू लहान आहेस तर लहान मुलासारखेच वाग’. त्यावर मी त्याला काहीच म्हणालो नाही, हे समजून सांगत होतो. तोपर्यंत दोन्ही संघातील खेळाडू जमा झाले. शेवटी सर्व खेळाडू एकमेकांच्या हातात हात देत होते तेव्हा हर्षलने माझ्याकडे दुर्लक्ष केले.

सिराजने वाद उकरून काढला नसता तर हे प्रकरण पुढे वाढले नसते, असे रियान परागचे म्हणणे आहे.