Robin Uthappa Arrest Warrent : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योगदानामध्ये फसवणूक केल्याच्या आरोपावरून भारताचा माजी सलामीवीर रॉबिन उथप्पाविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. हे वॉरंट, कथितपणे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा न केलेल्या २३.३६ लाख रुपयांच्या रकमेशी संबंधित आहे. रॉबिन उथप्पा सेंटॉरस लाइफस्टाइल ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेडचा ​​संचालक त्यावेळचे हे प्रकरण आहे. हे अटक वॉरंट प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त शदक्षारा गोपाल रेड्डी यांनी जारी केले आहे.

कर्नाटकातील पुलकेशीनगर पोलिसांना या अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते, परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, उथप्पा त्याच्या निवासस्थानी सापडला नाही. हे प्रकरण ईपीएफ निधीबाबतच्या त्याच्या कथित भूमिकेवर केंद्रित आहे. उथप्पा विरोधातील अटक वॉरंट, सुरुवातीला ४ डिसेंबर रोजी अंमलात आणण्यात आले होते, पण तपास सुरू असल्याने त्याचीअंमलबजाणी करण्यात आली नव्हती.

प्रादेशिक पीएफ आयुक्त शदक्षारा गोपाल रेड्डी यांनी पूर्व बंगळुरूमधील पुलकेशीनगर पोलिस ठाण्याला उथप्पा विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याचे निर्देश ४ डिसेंबर रोजी दिल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. पण, पोलिसांनी स्पष्ट केले की, रॉबिन उथप्पा वॉरंटमध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर गेल्या वर्षभरापासून राहत नाही आणि तो सध्या तो दुबईत आहे.

पोलिसांनी हे वॉरंट केआर पुरम येथील पीएफ कार्यालयात परत पाठवले आहे. उथप्पा आता त्यांच्या अखत्यारीत नसल्याची माहिती त्यांना देण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, उथप्पाच्या विरोधात कोणतीही एफआयआर नोंदवण्यात आलेली नाही कारण याबाबत कोणतीही औपचारिक तक्रार दाखल झालेली नाही.

रॉबिन उथप्पा दुबईत

या प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधिकारी म्हणाले की, “आम्हाला एका आठवड्यापूर्वी पीएफ कार्यालयातून पत्र मिळाले. यामध्ये अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्याची विनंती करण्यात आली होती. उथप्पा पूर्वी पुलकेशीनगर येथील व्हीलर रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. आमचे कर्मचारी पत्त्यावर गेले तेव्हा त्यांना कळाले की, उथप्पाने एक वर्षापूर्वीच ही मालमत्ता रिकामी केली होती आणि तो आता दुबईत राहतो. आम्ही याबाबत पीएफ कार्यालयाला कळवले आहे.”

हे ही वाचा : मॅकस्वीनीला डच्चू, कोन्सटासला संधी; अखेरच्या दोन कसोटींसाठी ऑस्ट्रेलिया संघात महत्त्वपूर्ण बदल

रॉबिन उथप्पाची कारकिर्द

रॉबिन उथप्पा २००४ मध्ये भारताने जिंकलेल्या १९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट संघाचा सदस्य होता. यानंतर दोन वर्षांनी त्याला भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. तो भारताकडून ४६ एकदिवसीय आणि १३ टी-२० सामने खेळला आहे. २००७ मध्ये भारताने पहिला टी-२० विश्वचषक जिंकलेल्या दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

Story img Loader