Robin Uthappa on Depression and Suicide: भारताचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पाने इंग्लंडचा माजी खेळाडू ग्रॅहम थॉर्पच्या आकस्मिक मृत्यूनंतर स्वत:च्या संघर्षाची कहाणी सांगितली आहे. थॉर्प यांनी या महिन्याच्या सुरुवातीला नैराश्यामुळे आत्महत्या केली होती. उथप्पाने खुलासा केला आहे की त्याच्या आयुष्यात एक वेळ अशी होती जेव्हा तो नैराश्याशी झुंजत होता आणि आत्महत्येचा विचार करत होता. थॉर्प व्यतिरिक्त, भारताचा माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सन याने वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली.
हेही वाचा – Photos: धोनीची लेक झिवा रांचीच्या सर्वात महागड्या शाळेत शिकते, किती आहे फी?
भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने त्याच्या नैराश्याच्या काळात तो कसा झुंज देत होता याचा खुलासा केला आहे. उथप्पा त्याच्या यूट्यूब चॅनलवर २००९ ते २०११ मधील त्याच्या आयुष्यातील सर्वात संघर्षमय दिवसांबद्दल सांगताना म्हणाला, “ त्यावेळेस तुम्हाला असे वाटते की तुम्ही निरुपयोगी आहात, तुम्हाला असे वाटते की तुम्ही ज्या लोकांवर प्रेम करता त्यांच्यासाठी तुम्ही ओझे आहात. तुम्हाला हताश वाटतं आणि प्रत्येक पाऊल जड होत जातं…”
“मी कित्येक महिने असाच अंथरूणात पडून होतो, मला अंथरुणातून उठावंसही वाटतं नव्हतं. मला आठवतं २०११ मध्ये, मी माणूस म्हणून कसा झालो आहे, याची लाज वाटत होती आणि जवळपास मी संपूर्ण वर्ष स्वतःला आरशात पाहू शकलो नाही,” असं तो पुढे म्हणाला.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला, इंग्लंडचे माजी फलंदाज ग्रॅहम थॉर्प यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झाले होते. दीर्घकाळ आजारामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती होती. पण त्यांच्या निधनानंतर काही दिवसांनी त्यांनी नैराश्याशी झुंज देत स्वत:चा जीव घेतला, असा त्यांच्या पत्नीने खुलासा केला.
“ग्रॅहम थॉर्प आणि त्यांच्या कुटुंबाचा विचार करून मला खूप वेदना होत आहेत. त्यांनी किती त्रास सहन करून मग शेवटी इतके मोठे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला असेल, याचा आपण विचारही करू शकत नाही. त्याच्या कुटुंबासाठी मी प्रार्थना करत आहे. भारतातील डेव्हिड जॉन्सन यांनाही याच परिस्थितीचा सामना करावा लागला होता,” उथप्पा त्याच्या व्हिडिओमध्ये म्हणाला.
१९९६ मध्ये दोन कसोटी सामने खेळलेले माजी भारतीय क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सन यांचे बेंगळुरूमधील एका अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून बाल्कनीतून पडून निधन झाले. जॉन्सन हे गेल्या वर्षभरापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत आहे आणि रुग्णालयाच्या फेऱ्या मारत होते. जॉन्सन यांच्या निधनापूर्वी शेवटच्या आठवड्यात ते हॉस्पिटलमध्ये होते आणि तीन दिवसांपूर्वीच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. उथप्पाने २०१९ मध्ये भारताचे माजी सलामीवीर आणि राष्ट्रीय निवडकर्ता व्हीबी चंद्रशेखर यांनी आत्महत्या केल्याचाही उल्लेख केला.
उथप्पाने हे देखील सांगितले की त्याला सुरुवातीला क्लिनिकल नैराश्याने ग्रासले आहे हे त्याला कळलेसुद्धा नाही. उथप्पा म्हणाला, “मी यातून जात आहे हे देखील मला कळलं नाही. माझं डोकं खूप जड व्हायचं, माझे डोळे, माझे खांदे, माझे पाय जड व्हायचे. यामागे काय कारण आहे, नेमकं काय घडतंय यासाठी माझ्याकडे कोणतेही स्पष्टीकरण नव्हते.”
रॉबिन उथप्पाने त्याच्या एक्स अकाउंटवर एक व्हीडिओ शेअर करत लिहिले आहे की, ‘मी क्रिकेटच्या मैदानावर अनेक लढायांचा सामना केला आहे, परंतु नैराश्यासोबत लढण्याइतकी कोणतीही लढाई कठीण नव्हती. मी मानसिक आरोग्याविषयी बोलत आहे कारण मला माहित आहे की मी एकटा नाही. मी #TrueLearnings च्या या एपिसोडमध्ये माझा प्रवास शेअर करत आहे आणि चला सर्व मिळून मानसिक स्वास्थ्यावर मोकळेपणाने बोलूया.